। तळा । वार्ताहर ।
तळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी अस्मिता चंद्रकांत भोरावकर, तर उपनगराध्यक्षपदी चंद्रकांत महादेव रोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तळा नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकहाती सत्ता प्रस्थापित करत शिवसेनेला सत्तेतून पायउतार केले. त्यामुळे नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष विराजमान होणार, हे निश्चित झाले होते.
नगराध्यक्षपदासाठी चंद्रकांत रोडे यांचे एकमेव नाव आघाडीवर असताना नगराध्यक्षपदाचे आरक्षण हे सर्वसाधारण महिला असे पडल्याने अस्मिता भोरावकर, ग्रीष्मा गणेश बामणे व माधुरी शैलेश घोलप यांच्या नावाची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत होती. अखेर खा. सुनील तटकरे यांनी जेष्ठ नेते चंद्रकांत भोरावकर यांच्या पत्नी अस्मिता भोरावकर यांच्या नावाची घोषणा केली. त्यानुसार दि. 4 रोजी अस्मिता भोरावकर यांचा एकच अर्ज दाखल झाल्याने नगराध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तर उपनगराध्यक्षपदी चंद्रकांत रोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी बोलताना नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांनी तळा शहरातील सर्व जनतेचे आभार मानले तसेच सर्वांना सोबत घेऊन तळा शहराचा विकास करणार असे आश्वासन दिले. याप्रसंगी आ. अनिकेत तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.