जयंत माईणकर
संपूर्ण कर्नाटकात गाजत असलेल्या हिजाब या वादाचा धर्माशी काहीही संबंध नाही, तर सर्व काही राजकारणाशी आहे. मे 2023 च्या राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्याला हवा तो मुद्दा समोर करून राजकीय पोळी भाजण्याचा हा प्रयत्न आहे.
मात्र त्याचबरोबर शाळेत आणि कनिष्ठ महाविद्यालयात कोणता गणवेश असावा हे ठरवण्याचा अधिकार त्या संस्थेला असतो. अनेक मिशनरी शाळेत मुलींना मेंदी, टिळा लावण्यास मनाई असते. त्यांच्या शाळेच्या प्रार्थनेत येशू ख्रिस्ताचा उल्लेख असतो. आणि याठिकाणी शाळा आपल्या अधिकारांचा वापर करून आपले गणवेश ठरवतात किंवा निर्बंध घालतात.
कर्नाटकातील उडुपी या गावात शासकीय पूर्व विद्यापीठ महाविद्यालयात हा प्रकार घडला.अकरावी आणि बारावीला पूर्व विद्यापीठ शिक्षण म्हटलं जात.त्यामुळे अर्थात बारावीपर्यंतचा गणवेश ठरवण्याचा अधिकार शाळेच्या प्रशासनाला असतो.
गेल्या वर्षाच्या अखेरीपर्यंत हिजाब घालणे ही समस्या नव्हती. मुस्लिम विद्यार्थिनींना डोक्यावर स्कार्फ घालून वर्गात जाण्याची परवानगी होती आणि अगदी हिंदू विद्यार्थ्यांनीही कधीही आक्षेप घेतला नव्हता. मग, एके दिवशी, के रघुपती भट, उडुपीचे भाजप आमदार आणि
उडुपी येथील गव्हर्नमेंट पीयू कॉलेज फॉर गर्ल्स महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष, यांनी मुस्लिम मुलींना वर्गात हिजाब घालण्यापासून रोखण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय आपण नियमानुसार घेतल्याच त्यांचं म्हणणं. या शिक्षण संस्थेत कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणार्या एकूण सुमारे एक हजार पैकी शंभरच्या आसपास अल्पसंख्यांक समाजाचे.
हिजाब वेगवेगळ्या रंगात आणि अनेक स्टाईल्समध्ये येतो. पाश्चात्य देशांमध्ये जे हिजाब सर्वाधिक दिसतात ते डोकं आणि गळा पूर्णपणे झाकतात, पण चेहरा स्पष्टपणे दिसतो.
हिजाबचे वेगवेगळे एकूण सात प्रकार सांगता येतील.
1) हिजाब
‘हिजाब’चा शब्दशः अर्थ हा कुठलीही गोष्ट झाकणे किंवा त्यावर पांघरूण घालणे, असा आहे. आता हिजाब म्हटलं की लगेच मुस्लीम स्त्रिया डोक्यावरून घेतात तो स्कार्फ डोळ्यांसमोर येतो.
2) नकाब
नकाब चेहर्यासाठीचा एक पदर असतो, ज्यात डोळ्यांभोवतीचा भाग उघडा असतो. तो स्वतंत्रपणे फक्त चेहरा झाकण्यासाठी वापरतो येऊ शकतो, किंवा त्याला हिजाबच्या सोबतीनेही घालता येतं.
3) बुरखा
मुस्लीम महिला सर्वांत जास्त पर्दानशीन असतात त्या बुरख्यात. डोक्यापासून पायांपर्यंत, असं अख्खं शरीर झाकलेलं असतं आणि फक्त डोळ्यांसमोर येणार्या भागावर एक जाळी असते.
4) अल-अमिरा
अल-अमिरा या वस्त्राचे दोन भाग असतात. एक म्हणजे कॉटन आणि पॉलीस्टरपासून बनलेली घट्ट बसणारी टोपी, आणि दुसरा म्हणजे एक झोळीसारखा स्कार्फ.
5) शायला
आखाती देशांमधला एक लोकप्रिय स्कार्फचा प्रकार म्हणजे शायला. हा लांबलचक स्कार्फ डोक्याभोवती गुंडाळून, कमीज किंवा टॉपवर खांद्याजवळ त्याला पिन लावली जाते.
6) खीमार
खीमार एक लांब केपसारखा कपडा असतो, जो डोक्यावरून थेट कमरेपर्यंत असतो. त्याने डोकं, गळा आणि खांदे झाकले जातात, पण चेहर्यावर पदर नसतो.
7) चादोर
इराणमधल्या महिलांमध्ये चादोर खूप प्रसिद्ध आहे. घराबाहेर पडायचं असल्यास त्या हे वस्त्र घालतात, जे पूर्ण शरीर झाकतं. कधी कधी त्याच्यासोबत एक छोटा हेडस्कार्फ असतो.
जगभरातल्या मुस्लीम महिला अनेक प्रकारचे हेडस्कार्फ बांधतात, मग तो हिजाब असो, नकाब किंवा बुरखा. यातला फरक सामान्यतः लक्षात येत नाही, म्हणजे कुठला पूर्ण चेहरा झाकतो, कुठला फक्त डोक्यावरून घेतला जातो, आणि कशात डोळ्यांवर जाळी असते.
आपल्याकडे जो बुरखा वापरला जातो, त्यालाच पर्यायी शब्द म्हणून हिजाब हा शब्दही वापरला जातो. पण त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. हिजाब हा फक्त डोकं झाकणं, आपण जसं स्कार्फ बांधतो त्यापद्धतीच्या प्रथेला हिजाब असं म्हणतात. आणि संपूर्ण चेहरा झाकून, काळा अंगावर झब्बा घालण्यात येतो त्याला बुरखा असं म्हणतात. सुन्नींमध्ये काळा बुरखा वापरण्यात येतो. तर शिया किंवा बोहरी समाजात रंगीबेरंगीसुद्धा वापरण्यात येतात. हिजाब आणि बुरखा यामध्ये फरक आहे. हिजाब म्हणजे चेहरा झाकणे तर बुरख्यामध्ये संपूर्ण शरीर झाकले जाते. पर पुरुषाने स्त्रीकडे वाईट नजरेने पाहू नये म्हणून मुस्लिम धर्मानुसार स्त्रियांनी बाहेर पडताना बुरखा परिधान करावा असं सांगितले जातं,. परपुरूष आपल्याकडे आकर्षित होऊ नये यासाठी बुरखा घातला जातो. असे नियम केवळ मुस्लिम महिलांना नाही, तर मुस्लिम पुरुषांना देखील आहेत. मुस्लिम पुरुषांनी परस्त्रीकडे नजर वर करून पाहू नये असे देखील धर्मात सांगण्यात आले आहे, अस सांगितलें जाते. वस्तुस्थिती अशी आहे की कुराणामध्ये हिजाब हा जो शब्द वापरलेला आहे, त्याचा अर्थ त्यांनी फक्त डोकं झाकणं आणि डिसेंट कपडे वापरणं या अर्थाने वापरलेला आहे. बुरखा हा नंतर आलेला प्रकार पुरुष प्रधान मानसिकतेतून आलेला आहे. स्री माझी प्रॉपर्टी आहे आणि माझ्या प्रॉपर्टीला इतरांनी पाहू नये अशी ती भावना आहे. हे इस्लाममधून आलेलं नाही. इस्लामी कल्चरमधून आलेलं आहे. कुराणात, इस्लाममध्ये ते नाही, असं मानणारा एक वर्ग मुस्लिम समाजात आहे.
अर्थात वर्गात हिजाब घालण्याच्या बाजूने आणि विरोधात निदर्शने करणार्या बहुसंख्य विद्यार्थ्यांना लर्रािीी षीेपीं ेष ळपवळर (उऋख) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (-इतझ) यांचे समर्थन मिळाले. उऋख ही मुस्लिम समाजाकरता काम करणारी संघटना आहे.
आता हिजाबचा मुद्दा चिघळल्याने काँग्रेस, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दक्षिण कन्नड आणि उडुपीच्या मुस्लिम सेंट्रल कमिटीने विधानसभा निवडणुकीपूर्वी काही राजकीय उबदारपणा मिळवण्याच्या आशेने हिजाब पेटवण्यास सुरुवात केली आहे. आणि या घटनेमुळे तिहेरी तलाक संपवणार्या भाजप सरकारला एक आयती संधी मिळाली आणि. शबरीमाला येथील अयप्पा मंदिरात 10 ते 50 वयोगटातील स्त्रियांना मंदिरात प्रवेश नाकारण्याच्या मुद्द्यावर मात्र भाजप दुटप्पी भूमिका घेतो. गृहमंत्री अमित शहा यांनी तर सर्वोच्च न्यायालयाने सर्वांना प्रवेश देण्याच्या निर्णयाला विरोध करत न्यायालयाने निर्णय देताना आस्था मान्यता यांचा विचार करावा असा सल्लाही दिला तर कापड उद्योग मंत्री असलेल्या स्मृती इराणी पूजा करण्याचा अधिकार सर्वांना मात्र अपमान करण्याचा नाही, असं विषयाला सरळ उत्तर न देणार विधान केलं होतं. आपले पती पारसी असल्याने पारसी अग्यारीत मुलांना आणि पतीला प्रवेश दिला आणि हिंदू असल्यामुळे आपल्याला प्रवेश त्यांनी सांगितलं.
अर्थात भाजपसुद्धा आस्था आणि मान्यता यांना महत्त्व देण्याच्या विचारांचा असून शबरीमाला किंवा इतर हिंदू धर्मिक बाबतीत आस्था आणि मान्यता यांना धक्का न लावण्याच्या विचारांचा आहे. आता इतर धर्मीयांच्या सुद्धा आस्था आणि मान्यता असू शकतात. पण त्याबाबतीत सत्ताधारी भाजप मात्र उदासिन आहे.
तिहेरी तलाक, हिजाब, बुरखा याबाबतीत आस्था आणि मान्यता यांच्या विरोधात भाजप जातो. पण हिच आस्था आणि मान्यता सती प्रथा, केशवपन इत्यादी हिंदू समाजातील उच्चाटन झालेल्या प्रथांच्या बाबतीत ते मान्य करणार नाहीत. पण शबरीमाला मध्ये प्रथा पाळली जावी असं त्यांना वाटतं.
माझ्या मते धर्मातील कुठल्याही आस्थेला, मान्यतेला महत्त्व न देता केवळ शास्त्रीय आणि मानवतेच्या आधारावर त्यांचा विचार करावा. आणि ही भूमिका सर्वच धर्मांच्या बाबतीत लागू असावी.
जसा बारावीपर्यंत गणवेश हा सर्व जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांना सारखाच आणि आवश्यक असतो. गणवेशात काही गोष्टी नसाव्या हेही सांगण्याचा अधिकार शाळांना असतो. या विषयावर काँग्रेसने योग्य भूमिका घेणं आवश्यक आहे. कारण भाजपला तोडीस तोड आव्हान कर्नाटकात फक्त काँग्रेस देऊ शकतो. त्यामुळे या विषयावर भाष्य करताना आपल्या हातून शहाबानो प्रकरणासारखी एखादी घोडचूक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कोणी बिकिनी पासून काय घालावे काय नेसावे हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे हे प्रियांका गांधी यांचं विधान योग्य आहे.
आता या विधानातील केवळ बिकिनी या शब्दाचा समाचार घेत कपड्यांमुळे बलात्कार वाढतात अस कर्नाटकातील भाजपचे आमदार रेणुकाचार्य यांनी म्हणणं हे त्यांच्या खालच्या दर्जाच्या बौद्धिक आणि वैचारिक पातळीच दर्शन घडवत. हिजाब परिधान केल्यामुळे आपल्याला वर्गात प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप महाविद्यालयातील सहा विद्यार्थिनींकडून करण्यात आला आहे. हिजाबसाठी शिक्षणापासून वंचित ठेवणं योग्य आहे का हा खरा प्रश्न आहे.
मूळ पाकिस्तानची नागरिक असलेल्या नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मलाला युसुफझई हिनेदेखील मुलींना हिजाब घालून शाळेत जाण्यापासून रोखणं हे भयंकर असल्याचं म्हटलंय. भारतीय नेत्यांनी मुस्लिम महिलांना कमी लेखणं थांबवायला हवं’ असंही मलालानं म्हटलंय. एकूण या प्रकरणाचा राजकीय फायदा घेण्याचा भाजप प्रयत्न करत आहे. ती संधी त्यांना मिळू न देण्यासाठी काँग्रेस ने आपली योग्य पावले आखावित. तूर्तास इतकेच!






