। चिपळूण । वृत्तसंस्था ।
तालुक्यात कलिंगड लागवडीचे क्षेत्र विस्तारत आहे. कलिंगडला मोठी बाजारपेठ उपलब्ध असल्याने या वर्षी तब्बल 100 एकरांहून अधिक क्षेत्रावर कलिंगड पिकाची लागवड झाली आहे. उत्पादन खर्चाच्या दुप्पट फायदा मिळवून देणारे हे पीक असल्याने शेतकरी कलिंगड लागवडीकडे वळत आहेत.
तालुक्यातील पेढांबे भागात यापूर्वी परप्रांतीय कलिंगड लागवडीतून लाखो रुपये कमवत होते. नंतर स्थानिकांनी जागृत होऊन कलिंगड लागवडीला सुरुवात केली. आता दसपटी, खाडीपट्टा, वेहळे, सावर्डे परिसरात कलिंगडची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे. तयार झालेले कलिंगड शहरात तसेच मुंबई-गोवा आणि गुहागर-विजापूर महामार्गालगत स्टॉल टाकून विक्री केली जात आहे. शेतकर्यांच्या या प्रयोगाला मोठे यश मिळाले आहे.
आता कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार बहुतांश शेतकर्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. यात मल्चिंग पेपरवर प्लास्टिक ट्रे मध्ये स्वतः रोपे तयार करून त्यांची पूर्ण लागवड केली जात आहे. वेहळेतील अन्नपूर्णा महिला बचतगटाने सात एकर क्षेत्रावर कलिंगडची लागवड केली आहे. तालुक्यातील हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. दिशानंतर संस्थेने चिपळूण तालुक्यातील अनेक शेतकर्यांना कलिंगडच्या बियांचे वाटप केले होते. त्यामुळे शंभर एकरहून अधिक क्षेत्रावर कलिंगडची लागवड झाल्याचा अंदाज आहे.
फळपिकांबरोबर कलिंगड आणि त्यापासून तयार होणार्या पदार्थांनाही हक्काची बाजारपेठ उपलब्ध आहे. शासनानेही प्रक्रिया उद्योगांसाठी प्रशिक्षण आणि निधीची तरतूद केली आहे. त्याचाही फायदा घेत शेतकर्यांनी प्रक्रिया उद्योगात उतरण्याची आवश्यकता आहे. – राहूल अडके, तालुका कृषी अधिकारी चिपळूण