। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठणे विभागातील कोंडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित, कोंडगाव या संस्थेची अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक शुक्रवारी (दि.25) घेण्यात आली. या निवडणुकीत संस्थेच्या अध्यक्षपदी शेकापचे नेते अनंत आत्माराम वाघ तर उपाध्यक्षपदी नथुराम घासे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकी वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकारी संस्था रोह्याचे सहाय्यक निबंधक आर.जे.कापडणे यांनी कामकाज पहिले.
कोंडगाव, पळस, पिगोंडे, कडसुरे, वांगणी व वणी या ग्रामपंचायती मधील गावांतील सुमारे एक हजार शेतकरी सभासदांचा समावेश असलेल्या या संस्थेच्या दि. 8 मार्च रोजी पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वच्या सर्व 13 जागा जिंकत शेकापने आपले वर्चस्व सिद्ध केले होते. या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या वेळी संस्थेचे सचिव वैभव पाटील, संचालक निखिल मढवी, प्रवीण जांबेकर, एकनाथ राजीवले, मधुकर मालुसरे, अशोक शिर्के, जयंत वाघ, हेमंत वाघ, अनुराधा वाघ, शेकाप महिला नेत्या कांचन माळी, गोविंद हंबीर, देवकी ढेबे आदींसह संस्थेचे सभासद उपस्थित होते.