काही दिवसात वेगवान आणि प्रदूषणमुक्त
| रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम अखेर सात वर्षांनी शंभर टक्के पूर्ण झाले असून या मार्गावर रेल्वेचा प्रवास येत्या काही दिवसात वेगवान आणि प्रदूषणमुक्त होणार आहे. सहा टप्प्यातील विद्युतीकरणाचे कामे पूर्ण झाले असून टप्प्याटप्प्याने वीजेवरील गाडया धावण्यास सुरवात होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
भारतीय रेल्वेतर्फे ‘मिशन-नेट झिरो कार्बन उत्सर्जनाच्या दिशेने वाटचाल’ या योजनेअंतर्गत पर्यावरणपूरक, हरित आणि स्वच्छ वाहतुकीसाठी संपूर्ण ब्रॉडगेज नेटवर्कचे विद्युतीकरण करण्यात येत आहे. केंद्र सरकार रेल्वे विद्युतीकरणातून हरित वाहतुकीचा टप्पा पूर्ण करत आहे. त्यात कोकण रेल्वेचा समावेश करण्यात आला आहे.कोकण रेल्वेचा संपूर्ण मार्ग 741 किलोमीटरचा आहे. त्याच्या विद्युतीकरणाची पायाभरणी नोव्हेंबर 2015 मध्ये करण्यात आली. या प्रकल्पाची एकूण किंमत 1 हजार 287 कोटी रुपये आहे. त्यानंतर करोना काळातही काम चालू ठेवले होते. संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाची सुरक्षाविषयक तपासणी मार्च 2020 पासून सहा टप्प्यांमध्ये यशस्वीरित्या करण्यात आली. रत्नगिरी आणि थिविम दरम्यानच्या शेवटच्या विभागाची तपासणी 24 मार्चला झाली. त्याचा अहवाल 28 मार्चला अधिकृतरित्या रेल्वे सुरक्षा विभागाकडून प्राप्त झाला. कोकण रेल्वेचा अवघड भूभाग आणि प्रतिकूल वातावरणामुळे हा विद्युतीकरण प्रकल्प हे रेल्वे प्रशासनापुढे आव्हानात्मक होते. मात्र त्या परिस्थितीवर मात करत रेल्वे प्रशासनाने काम पूर्ण केले. पावसाळ्यात तीव्र पडणार्या पावसामुळे विद्युतीकरण मोहीम अखंड सुरू राहण्यासाठी अनेक ठिकाणी विशेष व्यवस्था करावी लागली आहे.
गोव्याकडील भागातील टप्प्याचे काम सर्वात प्रथम पूर्ण झाले. त्यानंतर रोहा ते रत्नागिरी या टप्प्याचे काम करण्यात आले. सर्वात शेवटी रत्नागिरी ते थिविम या नव्वद किलोमीटरच्या भागाचे विद्युतीकरण झाले. करबुडेसारखे मोठे बोगदे या मार्गावर असल्यामुळे विद्युतीकरणाची यंत्रणा बसवण्याचे सर्वाधिक आव्हान प्रशासनापुढे होते. कोकण रेल्वे महामंडळाचे जनसंपर्क विभागाचे उपमहाप्रबंधक गिरीश करंदीकर यांनी सांगितले की, कोकण रेल्वे हा भारतीय रेल्वेतील सर्वात मोठया रेल्वे मार्गांपैकी एक आहे. कोकण रेल्वे मार्गावर नव्याने विद्युतीकरण केलेल्या मार्गावर टप्प्या-टप्प्याने इलेक्ट्रिक ट्रॅक्शनसह ट्रेन चालवल्या जातील. कोकण रेल्वे नेहमीच सुरक्षा पाळत आली असून विद्युतीकरणाच्या दृष्टीने योग्य नियोजन केले आहे.