। खोपोली । प्रतिनिधी ।
खोपोलीतील शितल गायकवाड या तरूणीने लहान वयात कराटे क्षेत्रात प्रवेश केले. कराटे, झुडो, बाँक्सिंग, रेसलिंग अशा विविध स्पर्धांमध्ये 23 वर्षाच्या कालावधीत राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय स्पर्धकांमध्ये सुवर्णपदके मिळवून खोपोली शहराचा नावलौकिक करीत असताना मध्यप्रदेश येथील कार्यक्रमात भारत भूषण, मुंबईत आयकॉन वूमन अवार्ड आणि पुणे येथे वुमन सुपर अचिव्हर्स अवॉर्ड 2022 या वेगवेगळ्या ठिकाणच्या पंचतारांकित कार्यक्रमात सन्मानित आल्याने खोपोली शहराच्या शिरपेचात आणखीन मानाचे तुरे रोवल्याने शितल गायकवाडवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना.रामदास आठवले, रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खालापूर तहसिलदार आयुब तांबोली, खोपोली नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनुप दुरे यांनी दुरध्वनीवरून संपर्क करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
खोपोली शहरातील सर्वसामान्य कुटूंबातील शितल गायकवाडने 23 वर्षाच्या कालावधीत 126 स्टेट, 132 नॅशनल आणि 8 वेळा इंटरनॅशन सुवर्णपदके मिळविली आहेत. मध्यप्रदेश येथे दिले जाणार्या भारत भूषण पुरस्कारासाठी 6 हजार वर्ल्ड चॅम्पियने महिलांचे मानांकन होते त्यामधील निवडलेल्या 30 महिलांनामधून शितल गायकवाड हिला भारत भूषण पुरस्काराने हिंदी चित्रपट अभिनेते राजू वर्मा, स्थानिक आम.सुनिल जयस्वाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे. मुंबईत सरस्वती दादासाहेब फालके इंटरनॅशनल आयकॉन वूमन अवार्ड फालके यांचे नातू दिनेश फालके यांचे हस्ते देण्यात आले. यावेळी अभिनेत्री अंजना मुमताज उपस्थित होते. पुणे येथे कॉमनवेल्थ एक्सलन्स अवॉर्ड, वुमन सुपर अचीव्हर अवॉर्ड अभिनेत्री अमीषा पटेल यांच्या हस्ते देण्यात आले आहे.