चार आरोपींवर गुन्हा दाखल
। माणगाव । प्रतिनिधी ।
कत्तलीसाठी जनावरे कोंबून घेऊन जाणारा आयशर टेम्पो पोलिसांनी पकडून टेम्पोसह 9 लाख 90 हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी चार आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा गुरुवार, दि.21 एप्रिल रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास इंदापूर, ता. माणगाव येथे घडला. याबाबतची फिर्याद माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई मयूर जनार्दन पाटील (26) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
या घटनेबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, गुन्ह्यातील आरोपी अब्दुल्ला नसुरुल्ला मुजावर (44) रा. मानखुर्द मंडाला, मुंबई 43, समीर निजाम कुरेशी (19) रा.लोटस गोवंडी मुंबई, संतोष सावकार पवार (42) रा. समर्थनगर इंदापूर माणगाव, रईस मुन्ना कुरेशी (52) रा. इंदापूर, ता. माणगाव यांनी संगनमत करून 7 लाख रुपये किमतीचा एक आयशर कंपनीचा मोठ्या आकाराचा जुना टेम्पो क्र.एम.एच.01 सीआर 8290 चॉकलेटी रंगाचा त्याची मागील बॉडी ताडपत्रीने झाकलेली, एकूण 2 लाख 60 हजार किमतीचे 13 मोठी व मध्यम म्हैस जातीची जनावरे प्रत्येकी किंमत 20 हजार रुपयांप्रमाणे, एकूण 30 हजार किमतीचे तीन लहान म्हैस जातीची जनावरे प्रत्येकी किंमत 10 हजार रुपयांप्रमाणे अशा वर्णनाचा एकूण 9 लाख 90 हजार रुपये किंमत असणारा माल पोलिसांनी जप्त केला. या गुन्ह्याप्रकरणी चारही आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. आघाव हे करीत आहेत.







