। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
वैशाख वणव्याने भाजून निघालेल्या धरतीला आपल्या जलधारांनी ओलेचिंब करण्यासाठी, घामाच्या धारांनी न्हावून निघालेल्या मानवाला दिलासा देणारी गुड न्यूज हवामान खात्याने दिली आहे. वरुणराजा वेळेपूर्वीच 10 दिवस अगोदरच केरळमध्ये दाखल होत असल्याचे शुभ वर्तमान आहे. आयएमडीचे महासंचालक डॉ. एम. महापात्रा यांनी उन्हाचा सध्याचा ट्रेंड पाहता वरील अंदाज वर्तवला आहे.
सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. लोक गरमीमुळे हैराण झाले आहेत. दरम्यान, यंदा वेळेआधीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंदमानच्या समुद्रात मान्सुनसाठी अनुकुल वातावरण निर्माण झाले असल्याने मान्सून लवकर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बातमीमुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या लोकांसाठी दिलासा मिळणार आहे. त्यामुळे यावर्षी अनेकांना मान्सूनचा आनंद घेता येणार आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात
यंदा अंदमानमध्ये 10 दिवस आधी दाखल मान्सून होणार आहे. मे अखेरीस तो केरळमध्ये दाखल होणार असून साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे. सध्या वातावरणात प्रचंड प्रमाणात गरमीचे वातावरण असून यामुळे लोकांना उष्णतेच्या लाटेचाही सामना करावा लागत आहे. अधून मधून पावसाच्या सरीही राज्यातील काही भागात बरसत असतात.
मागील वर्षी मान्सूनने दोन दिवसांच्या उशिराने केरळमध्ये हजेरी लावली होती. यंदा मात्र लवकर दाखल होणार असल्याने शेतकर्यांसाठी ही खुशखबर असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेशमधील काही भागांमध्ये जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. नैऋत्य मॉन्सून साधारणत: 1 जूनपर्यंत केरळला पोहोचतो. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सुन महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता आहे.







