। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
नवी मुंबईच्या पावणे एमआयडीसीतील रासायनिक कंपनीला शुक्रवारी (दि.6) लागलेल्या भीषण आगीने अतिशय रौद्र रूप धारण केले होते. या आगीने संपूर्ण कंपनीला विळखा घातला होता. परंतू माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. पण, आग इतकी भयानक होती की आजूबाजूच्या आठ कंपन्यांमध्ये पसरून त्यातील सहा कंपन्या या आगीत जळून खाक झाल्या आहेत. या कंपनीला आग लागल्यानंतर तिथले दोन कामगार बेपत्ता होते. त्यातील एकाचा मृतदेह सापडला आहे.
आग लागलेल्या रासायनिक कंपन्यांमध्ये अनेक केमिकल ड्रग्ज होते. आणि उन्हामुळे जवळपास 70 मीटरपर्यंत आगीच्या झळा लागत होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझविण्यासाठी अथक प्रयत्न केले. आग अटोक्यात आल्यानंतर त्या कंपन्यांमधील केमिकल ड्रग्ज बाहेर काढण्यात आले. तसेच कंपन्यांमधील केमिकल ड्रग्जमुळे अग्निशमन दलाकडून मारण्यात येणार्या पाण्याचा काहीच उपयोग होत नव्हता.