तब्बल 35 लाख 40 हजारांचे हेरॉईन जप्त
। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईत वर्षानुवर्षे ड्रग्जचा व्यवसाय करणार्या बंटी आणि बबलीला मुंबईल दहिसर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघेही पती-पत्नी दहिसरच्या अंबावाडी परिसरात राहतात, दोघेही ड्रग्जची खरेदी-विक्री करतात. त्यांच्यावर यापूर्वीही अंमली पदार्थांची विक्री केल्याचा आरोप आहे.
झोन 12 चे डीसीपी सोमनाथ घार्गे यांना दहिसर परिसरात काही लोक ड्रग्जचा व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे डीसीपी पथकाच्या एटीसी पथकाने दहिसरच्या अंबावाडी जंक्शन पुष्प विहार कॉलनीत छापा टाकला, त्यात जमीर बाबू मुजावर आणि फरजाना जमीर मुजावर यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्या घरातून 35 लाख 40 हजार रूपये किंमतीचे 295 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले.
हे दोघे पती-पत्नी दीर्घकाळापासून हा व्यवसाय करत असून दोघेही सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत अंबावाडी रेल्वे मार्गावर अंमली पदार्थांची विक्री करायचे. त्यांच्याविरूद्ध कस्तुरबा पोलीस, एमएचबी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत सातहून अधिक गुन्हे दाखल आहेत.