भूपृष्ठ मंत्रालयाचे कामाचे ड्रोनद्वारे शुटींग
| पोलादपूर | प्रतिनिधी |
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामाचा वेग गेल्या काही दिवसांपासून वाढलेला दिसून येत असून एलऍंण्डटी ठेकेदार कंपनीने एका खासगी फोटोग्राफरकडून वीर ते पोलादपूर तालुक्यातील कोंढवी फाटयापर्यंतच्या कामाचे खासगीरित्या ड्रोनद्वारे शुटींग करीत काँक्रीट रस्त्याच्या कामाचा आढावा केंद्रीय भुपृष्ठ वाहतुक मंत्रालयाकडे सादर केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
पावसाळयापूर्वी वीर ते कोंढवी फाटयापर्यंतच्या कामातील त्रूटी व सुधारणा करून अंतिम कामानंतर एलऍंण्डटी ठेकेदार कंपनी गाशा गुंडाळण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती प्राप्त होत आहे. अंडरपासमध्ये मातीचे ढिगारे कोसळत असताना सर्व्हिसरोडवरील वाहतूक अंडरपासमध्ये काँक्रीट रस्त्यावरून सुरू करून वाहनांना सर्व्हिसरोडवरून अंडरपासमध्ये कोसळण्याऐवजी आता अंडरपासमध्ये लालमातीच्या ढिगार्यांखाली येण्याच्या धोक्याला सामोरे जावे लागणार आहे.
इंदापूरनजिक कशेणे गावात केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांची लोकार्पण सभा झाल्यानंतर रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील कामाचा आढावा घेत आवश्यक तेथे भुसंपादन, बायपास, फ्लायओव्हर आणि पोलादपूर शहरातील अंडरपास रस्त्याबाबत खा.सुनील तटकरे यांनी वीर ते पोलादपूरपर्यंतच्या दुसर्या टप्प्यातील कामांबाबत काही लोकोपयोगी सुधारणा करण्याच्या सुचना केल्या. यानंतर या कामामध्ये गती येऊन आश्चर्यकारकरित्या काम उरकते घेण्याची भूमिका एलऍंण्डटी ठेकेदार कंपनीने घेतल्याचे दिसून येऊ लागले.
जी नियोजित कामे आहेत ती तातडीने पूर्ण करण्यासाठी एलऍंण्डटी ठेकेदार कंपनीने सध्या प्रयत्न सुरू केले असून पश्चिमेकडील सर्व्हिसरोडबाबतीत असलेल्या न्यायप्रविष्ट प्रकरणांमध्ये भुसंपादन प्रक्रिया पूर्ण झाली असून मोबदल्याबाबतच्या वादांचा निकाल झाल्यानंतर मोबदल्याची रक्कम घ्या, भुसंपादन झालेली जमीन पश्चिमेकडील सर्व्हिसरोडसाठी ताब्यात घेऊन काम सुरू करू द्या, अशी भुमिका घेऊन आतापर्यंत रखडलेल्या या कामाला गेल्या काही दिवसांमध्ये गती प्राप्त झाली असून पावसाळयात पूर्वेकडील सर्व्हिसरोड हमखास अंडरपासमध्ये कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन अंडरपासमधूनच वाहतूक सुरू करण्यासाठी अंडरपासमध्ये दुपदरी दोन काँक्रीट रस्ते पूर्ण करण्यासाठी एलऍंण्डटी ठेकेदार कंपनीने युध्दपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत.