। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दितील चेराठी, काळकाई, वाघ्रणवाडी लगतच्या जंगल परिसरातील सुरु असलेल्या गावठी दारूच्या अनेक हातभट्ट्या नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलीसांच्या पथकाने काही दिवसांपूर्वीच उध्वस्त केल्या आहेत. गावठी दारु विरोधी मोहिमेचाच एक भाग म्हणून तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली उनाठावाडीच्या दक्षिण जंगल परिसरात बुधवार दि. 15 जून रोजी सकाळी धाड टाकली. यावेळी अवैधरित्या सुरु असलेल्या गावठी दारूच्या दोन हातभट्ट्या उध्वस्त करण्यात आल्या. यात 47 हजार 600 रूपये एवढ्या मोठ्या प्रामाणातील मुद्देमाल नष्ट करण्यात आला. गावठी दारु विरोधात आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे. या धाडीत एकूण 47 हजार 600 रूपयांचा एवढ्या मोठ्या प्रामाणाततील मुद्देमाल मिळून आला.
हा मुद्देमाल वाहतुकीस अवजड व अवघड असल्याने सदरचा मुद्देमाल हा जागीच नष्ट करून पेटवून देण्यात आला आहे. नागोठणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. नितीन गायकवाड, पो.ना. परेश मोरे, पो.शि. रामनाथ ठाकूर, पो.शि आशिष पाटील,पो.शि. निशांत पिंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान नागोठणे पोलिसांनी सुरु केलेल्या गावठी दारु विरोधी मोहिमेचे संपूर्ण नागोठणे विभागातील जनतेकडून स्वागत करण्यात येत असून पोलिसांनी या गावठी दारु माफियांचा कायमचा बंदोबस्त व नायनाट करुन गावठी दारुला नागोठणे विभागातून हद्दपार करुन त्रस्त झलेल्या महिला वर्गाचे आशीर्वाद मिळवावेत अशी मागणीही नगरिकांतून होत आहे.