। अलिबाग । वार्ताहर ।
आपल्या पूर्वजांनी योगसाधना ही दिलेली अमूल्य देणगी असून, शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी नियमितपणे योग आणि प्राणायाम करावे, ही देणगी आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे, असे प्रतिपादन रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी मंगळवारी येथे केले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अहमदनगर येथील केंद्रीय लोकसंपर्क ब्युरो, रायगड जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नेहरू युवा केंद्र आणि प्रिझम सामाजिक विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग येथील पोलीस कवायत मैदान येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग अभ्यास आणि योग प्रात्यक्षिके या विशेष प्रचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी श्री. दुधे बोलत होते.
यावेळी अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, सहाय्यक प्रचार अधिकारी फणीकुमार, प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या तपस्वी गोंधळी, स्पर्धा विश्व कॅडमीच्या सुचित्रा साळवी, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी निशांत रौतेला आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्री अंबिका योग कुटीर या संस्थेच्या विरेंद्र पवार आणि त्यांच्या योगशिक्षकांनी सर्व उपस्थित साधकांना योगाभ्यासाची माहिती देऊन विविध आसने आणि प्राणायामचा योगाभ्यास करून घेतला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शहरातील विविध ठिकाणी क्रीडा व प्रश्रमंजूषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा विश्व अकॅडमी, स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था, रोहा यांच्या सहकार्याने धावणे, गोळाफेक, लाठीकाठी, प्रश्रमंजुषा आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये शहरातील युवक-युवतींनी सहभाग घेतला. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी, तर आभार क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी मानले.