। अलिबाग । वर्षा मेहता ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कर्नाटकातील म्हैसूर या हेरिटेज शहरात आठव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुख्य कार्यक्रमात योगासने केली. म्हैसूर पॅलेस मैदानावर पंतप्रधानांसह 15,000 हून अधिक लोक योग सोहळ्यात सहभागी झाले होते. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि आयुष मंत्रालयाचे अधिकारी आणि कर्नाटक सरकार आणि इतर मान्यवरांनी या कार्यक्रमात योगासने केली.
भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करण्यासाठी, आयुष मंत्रालयाने योग दिनाच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांसाठी 75 ठिकाणे निश्चित केली आहेत. 27 सप्टेंबर 2014 मध्ये यूएन जनरल असेंब्लीमधील भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिनाची कल्पना मांडली होती. भारताने मंजूर केलेल्या मसुद्याला 177 देशांनी पाठिंबा दिला होता. योगाला सार्वत्रिक मान्यता आणि वाढत्या लोकप्रियतेसह संयुक्त राष्ट्र संघाने 11 डिसेंबर 2014 रोजी 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला.
योगामुळे विश्वात शांतता येते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी कर्नाटकातील प्रतिष्ठित मैसूर पॅलेसमधून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभाचे नेतृत्व करताना सांगितले. योग आता जीवनाचा भाग राहिलेला नाही, तर तो जीवनाचा एक मार्ग बनत चालला आहे, त्यांनी अधोरेखित केले.