सर्वपक्षीय बैठकीत निर्णय
। पनवेल । वार्ताहर ।
प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावे यासाठी प्रकल्पग्रस्त पुन्हा आग्रही झाले आहेत. दि.बा. पाटील यांच्या 9 व्या स्मृतिदिनी 24 जून रोजी प्रकल्पग्रस्त सिडकोला घेराव घालणार असल्याची माहिती विमानतळ नामकरण सर्व पक्षीय स समिती समन्वयक मनोहर पाटील यांनी दिली.
महिला आणि तरुणांचा या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल असा विश्वास समन्वयक दशरथ भगत यांनी या वेळी व्यक्त केला. दि.बा पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून दिलाच, शिवाय अनेक कामे केलेली आहेत. त्यामुळे सरकाने जनमताचा आदर करीत ही मागणी पूर्ण करून त्यांच्या कार्याचा गौरव करावा, अशी अपेक्षा माजी खासदार संजीव नाईक यांनी या वेळी व्यक्त केली.
28 एप्रिल 2021 सिडकोने पारित केलेला प्रस्ताव विखंडित करून स्व. दि. बा. पाटील यांचे नामकरण होऊ शकते. मात्र सिडको आडमुठी भूमिका घेत असल्याने सिडकोवर हा घेराव आंदोलन करण्यात येणार असल्याचे समन्वयक डॉ. राजेश पाटील यांनी सांगितले.या वेळी मुख्य कृती समितीचे माजी खासदार संजीव नाईक, काँग्रेस ओबीसी सेल अध्यक्ष संतोष केणे, मुख्य समन्वयक दशरथ भगत, डॉ. राजेश पाटील, शैलेश घाग आदी समिती सदस्य उपस्थित होते.