| माणगाव | वार्ताहर |
माणगावात एकाची 40 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दि.28 जून रोजी दुपारी 1 वाजता ते दि.4 जुलै रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी यांच्या मोबाईल 9920401640 वर कॉल करून त्यांच्या एसबीआय बँकेचे क्रेडिट कार्ड नंबरवरून पॉस्को कंपनी विळे-भागाड ता. माणगाव येथे घडला. या घटनेची फिर्याद शरद नामदेव पाटील (52) यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
या गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि,यांतील फिर्यादी शरद नामदेव पाटील यांना कॉल करून एसबीआय बँकेचे क्रेडिट कार्ड ऑफिस,नवी मुंबई येथून बोलतोय असे भासवून तुमचे एसबीआय बँकेचे क्रेडिट कार्डचे रिवार्ड पॉईंट तुम्हाला रोख रक्कम स्वरूपात तुमच्या क्रेडिट कार्डवर मिळतील, त्यामुळे शिल्लक राहिलेली उर्वरित क्रेडिट कार्ड बिलाची रक्कम क्रेडिट कार्डमधून वजा होईल, असे बोलून वारंवार फिर्यादी यांना कॉल करून विश्वासात घेऊन फिर्यादी यांच्याकडे फोनद्वारे कॉल करून क्रेडिट कार्ड नंबर व ओटीपी घेऊन फिर्यादी यांचे क्रेडिट कार्डवरील बिलाच्या रकमेत वाढ होऊन फिर्यादी यांची वेळोवेळी एकूण 40 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात येऊन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील हे करीत आहेत.