मच्छिमारांचे हाल, नवीन जेट्टीची मागणी
| बोर्लीपंचतन | वार्ताहर |
भरोडखोलची जेट्टी वादळाच्या तडाख्यात उद्ध्वस्त झाल्याने येथील मच्छिमारांचे हाल होणार आहेत. तरी शासनाने मच्छिमारांसाठी नवीन जेट्टी तयार करुन द्यावी, अशी मागणी भरोडखोलचे सरपंच दिनेश चोगले व येथील मच्छिमारांनी केली आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील भरोडखोल येथील मच्छिमारी करणार्यासाठी समुद्र हे पोट भरण्याचे साधन आहे. परंतु, नुकत्याच झालेल्या वादळी पावसामध्ये मच्छिमारांची होड्या लावण्यासाठी असणारी पन्नास वर्षे जुनी जेट्टी उद्ध्वस्त झाली आहे. त्यामुळे मच्छिमारांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या मासेमारी बंदी असली तरी ऑगस्ट महिन्यापासून पुन्हा मासेमारीला सुरुवात होणार आहे. त्यावेळी मासेमारीसाठी गेलेल्या होड्या बंदरात कुठे उभ्या करायच्या याची चिंता मच्छिमारांना लागली आहे.
तरी संबंधित अधिकारी, जिल्ह्याचे खासदार, आमदार आणि माजी पालकमंत्री यांनी लक्ष घालून हा मच्छिमारांचा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी भरोडखोलचे सरपंच दिनेश चोगले व येथील मच्छिमारांनी केली आहे.







