मुंबई । प्रतिनिधी ।
राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल लांबणीवर पडला आहे. 15 जुलैपर्यंत निकाल जाहीर करण्याची डेडलाइन शिक्षण मंडळाला पाळता आली नाही. आता येत्या आठवडाभरात दहावीचा निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती शिक्षण मंडळातील सूत्रांनी दिली आहे.
कोरोनामुळे राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता सरसकटपणे पास करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर 10 जूनपासून विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनाला सुरुवात झाली. मूल्यमापन आणि निकाल तयार करण्याचे काम 3 जुलैपर्यंत पूर्ण करून दहावीचा निकाल 15 जुलैपर्यंत जाहीर करण्याचे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले होते, परंतु ही डेडलाइन मंडळाला पाळता आलेली नाही. दहावीचा निकाल लांबणीवर पडला असून येत्या आठवडाभरात हा निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली.
राज्य शिक्षण मंडळाकडून मूल्यमापनसंदर्भात दिलेल्या कार्यपद्धतीत अनेक प्रकारच्या माहिती आणि त्याचे दस्तावेज गोळा करण्यासाठी नियमावली देण्यात आली होती. त्या नियमावलीत माहिती भरण्यासाठी शिक्षकांकडून प्रचंड मोठय़ा प्रमाणात त्रुटी झाल्याने हा निकाल लांबणीवर पडला असल्याचे मंडळातील वरिष्ठ अधिकारी सूत्राकडून सांगण्यात आले. मुंबईसह नाशिक, संभाजीनगर, नागपूर आदी शिक्षण मंडळातील कामकाज अद्यापही मोठय़ा प्रमाणावर पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळेच हा निकाल लांबणीवर पडला आहे.