। खांब-रोहे । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील शेतकरी कमी श्रमात जास्त उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी सध्या शेती व्यवसायात अत्याधुनिक यंत्राच्या वापरावर भर दिला जात आहे. यामधूनच गेल्या काही वर्षांपासून आधुनिक शेतीचा पर्याय समोर येत आहे. अत्याधुनिक शेती पध्दतीने शेतकर्यांचे कष्ट कमी होऊन कमी कालावधीत अधिकच उत्पन्न शक्य आहे. कोकणातील शेतकरी हा अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करत असतो. मात्र, आता जिल्ह्यातला शेतकरी हायटेक होऊ लागला आहे.
एकीकडे शेती परवडत नसल्याने काही शेतकर्यांनी शेतीकडे पाठ फिरविली असल्याचे पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे शेतीतून अधिकाधिक उत्पादन मिळविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे वापर करून शेतीतून जास्तीचे उत्पादन कसे मिळेल, यासाठी प्रगतशील शेतकर्यांचा प्रयास चालला आहे. जिल्ह्यातील शेतकरी पॉवर ट्रेलर व ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणी, ऊखळणी करणे, यंत्राच्या सहाय्याने लावणी, कापणी, झोडणी, मळणीची कामे करणे व त्याचबरोबर विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन त्याचाही शेतीसाठी योग्य पद्धतीने वापर करीत आहेत. त्यामुळे शेतकर्याचा वेळ आणि पैसा दोन्हीमध्ये बचत होत आहे.