। पेण । प्रतिनिधी ।
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पेण पालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या तिरंगा अभियानात वापरण्यात येणार्या राष्ट्रध्वजामध्ये त्रुटी असल्याचे निदर्शनास आलेले आहे. याबाबत तातडीने तपासणी करुन प्रिंटींग करणार्यांना सुधारणा करण्याचे निर्देश दिले असल्याचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी सुचित केले.
पेण नगरपालिकेमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या राष्ट्रध्वजांचे वेगवेगळे पाच झेंडे तपासले असता पाचही झेंड्यांचा आकार वेगवेगळा पहायला मिळाला. पहिल्या झेंडयाची रुंदी 21 इंच तर लांबी 27 इंच याचा अर्थ 2ः3 झेंडयाची साईज नाही. तसेच भगव्या रंगाचा पट्टा साडेसात, पांढर्या रंगाचा पट्टा सात तर हिरव्या रंगाचा पट्टाा साडेसहा इंचाचा आढळून आला. तर अशोकचक्र गोलाकार नसून तिरके होते. दुसर्या झेंडयाचा विचार केल्यास त्याची रुंदी 21.5 होती तर लांबी ही 26 होती तर भगवा 7.5, पांढरा 6.9, तर हिरवा 7.1, तर या मध्ये अशोकचक्र व्यवस्थित होते. अशा प्रकारे प्रत्येक झेंडयामध्ये विविधता आढळून आली.
रायगड जिल्हयाचा विचार केल्यास 5 लाख 35 हजार झेंडे विक्रीसाठी ठेवले होते. त्यातील पेणमध्ये पेण नगरपालिकेने 10 हजार तर पंचायत समितीने पहिल्यांदा 21 हजार 614 झेंडे मागवले होते. त्यानंतर कमी पडले म्हणून नव्याने एक हजार झेंडे मागविण्यात आले. असे एकूण पेण तालुक्यात 32 ते 33 हजाराच्या आसपास झेंडे मागविले आहेत. या सर्वच झेंड्यांमध्ये आकाराचा मोठा घोळ असून प्रत्येक झेंडयाची साईज वेगवेगळी पहायला मिळत आहे. ध्वजामध्ये सफेद रंग शुभ्र नसून, तो मळका असल्याचे दिसते. त्याचप्रमाणे ध्वजाची शिलाई कटिंग योग्य प्रकारे करण्यात आलेली नाही,
पेण तालुक्यामध्ये हे ध्वज पनवेल येथील सुप्रिम प्रिंटरकडून आलेले आहेत. तर नगरपालिकेसाठी अलिबाग येथील आग्रावकर नामक व्यक्तींच्या प्रिटींग प्रेसमधून झेंडे उपलब्ध झाले आहेत. झेंडे उपलब्ध करून देणार्या प्रिंटींग प्रेसच्या मालकांना ज्यावेळेला ऑर्डर दिली, त्यावेळेला नियमानुसार झेंडे देण्याचे आदेश दिले होते. आता पेण तालुक्यात हजारो नागरिकांनी राष्ट्रध्वज खरेदी केले आहेत. हे राष्ट्रध्वज पूर्णतः चुकीचे आहेत.
पेण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी झेंडयाचा विभाग विस्तार अधिकारी प्रसाद म्हात्रे पाहतात असे सांगितले. त्यावर म्हात्रे यांनी आम्ही पनवेलहून झेंडे मागविलेत.परंतु आकाराबद्दल आणि त्याच्यातील त्रुटी असल्याबाबत मला काहीही माहिती नाही,असे सांगितले.
दोन दिवसापूर्वी आम्ही नगरपालिकेत आलेल्या राष्ट्रध्वजांची तपासणी करण्यास सांगितले. त्यावेळी रंग, तसेच कटींगच्या बाबतीत त्रुटी लक्षात आल्या. परंतु आकाराच्या बाबतीत चुक झाल्याचे लक्षात आले नाही. मात्र, जेव्हा लक्षात आले तेव्हा आम्ही झेंडे पुरवणार्या एजन्सिला लेखी पत्र पाठविले आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात देखील आम्ही कळविणार आहोत.
जीवन पाटील, मुख्याधिकारी
झेंडयाच्या किंमतीमध्ये तफावत
रायगड जिल्हयामध्ये जे राष्ट्रध्वज विक्रीसाठी ठेवले गेले आहेत. त्या राष्ट्रध्वजाची मुळ किंमत व विक्री किंमत यामध्ये मोठी तफावत आहे. मात्र, याबाबत ना नगरपालिकेला माहिती, ना पंचायत समितीला माहिती परंतु, मुळ किंमत एक वेगळीच आहे. आणि विक्री किंमत ही एक वेगळी आहे.