| अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील किहीम समुद्रकिनार्यावर अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सदर मृतदेहाबाबत मांडवा पोलिस ठाण्याकडून तपास सुरु आहे.
याबाबतचे वृत्त असे की, किहीम भंडार आळी येथील श्रीनिवास म्हात्रे हे किहीम समुद्रकिनारी सकाळी चालण्यास गेले असता त्यांना किहीम गावच्या हद्दीत आदम वाडीच्या बाजूला एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह दिसून आला. याबाबतची माहिती श्रीनिवास म्हात्रे यांनी मांडवा पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी माहिती घेतल्यानंतर सदर इसमाचे वय अंदाजे 25 ते 30 वर्षाचे असून त्याच्या अंगावर वस्त्र नसल्याचे आढळले. सदर इसम पाण्यात बुडाल्याने त्याच मृत्यू होऊन समुद्राच्या भरतीत वाहत येऊन समुद्रकिनारी लागला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत मांडवा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
सदर इसम 155 सेंटीमीटर उंचीचा असून मजबूत बांधा अंगात कपडे नसलेला असून चेहरा डाव्या बाजूच्या डोक्यासह दिसून येत नाही. उर्वरित चेहर्याचा भाग सडलेला असून डावा हात पाण्याच्या प्रवाहात कुजून निखळलेला असून दोन्ही पाय पाण्यात सडून तुटलेले गुप्त भाग सडलेला असे वर्णन आहे. या अनोळखी मृतदेहाबाबत कोणाला काही माहिती असल्यास संबंधितांनी मांडवा सागरी पोलिस ठाणे येथे 02141 /247722 किंवा मोबाईल क्रमांक 9822578894 येथे संपर्क साधण्याचे आवाहन परिवेक्षणाधिन उपनिरीक्षक व्ही. आर. शिर्के यांनी केले आहे.