काँग्रेस पक्षात प्रवेश करणारे पुन्हा शिवसेनेत दाखल
। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान गिरीस्थान नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक या वर्ष अखेरीस होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर माथेरानमध्ये दररोज राजकीय घडामोडी घडत असून काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षात प्रवेश करणारे कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसंपर्क अभियानात पवार कुटुंबाने सेनेत प्रवेश केला.
शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरू असून माथेरान मधील जेष्ठ नागरिक अशोक पवार यांनी आपल्या दोन्ही मुलांसह शिवसेना पक्षात प्रवेश केला. अशोक पवार यांचे पुत्र नरेश पवार आणि महेश पवार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्या तिघांचा सेना प्रवेश माथेरान शिवसेनेचे शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी आणि पालिकेतील गटनेते प्रसाद सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी जेष्ठ शिवसैनिक योगेश जाधव, नगरसेवक नरेश काळे, शिवसैनिक कदम, युवा कार्यकर्ते गायकवाड आदींसह तरुण कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्वांनी माथेरान शिवसेना शहर कार्यालयात शिवसेनेत प्रवेश केला. सेनेत काही दिवसांपूर्वी चर्मकार समाजाच्या कार्यकर्त्यांनी सेनेत प्रवेश केला होता.