। तळा । वार्ताहर ।
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त इतिहास माझ्या राजांचा प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य तर्फे किल्ले तळगड येथे वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष तेजस शिवाजीराव बापमारे पाटील यांनी समस्त शिवभक्तांना मार्गदर्शन केले.
15 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वा. तळगडावर ध्वजारोहण समारंभाला सर्व शिवभक्त आणि शिवकन्या उपस्थित राहून मोहिमेला सुरवात करण्यात आली. ध्वजारोहण झाल्यानंतर तेजस बापमारे पाटील यांनी समस्त मोहिमेला आलेल्या शिवभक्त शिवकन्याना संबोधित करत किल्ले तळगड ची माहिती सांगितली. सुरवातीला गडावर तटबंदी जवळ असणारे गवत, झाडं जी तटबंदी ला धोका निर्माण करत होती ती काढण्यात आली, नंतर किल्ल्यावर जाण्यासाठी जो पायरी मार्ग आहे त्यावर गवत उगवल्यामुळे पायरी मार्ग दिसत नव्हता त्यामुळे तेथे साफसफाई करून पायरी मार्गाला मोकळा श्वास देण्यात आला.गडावरील रत्नाकर महादेव मंदिर येथे अध्यक्ष तेजस बापमारे पाटील यांनी अभिषेक करून सर्व शिवभक्तांसोबत येत्या दिवाळी च्या आत सदरील महादेव मंदिराला प्रतिष्ठान तर्फे छत बांधू असा संकल्प केला.
नंतर वृक्षारोपण करून मोहिमेची सांगता करण्यात आली. या मोहिमेसाठी सांगली, सातारा, पुणे, जालना, सोलापूर, मुंबई, अकोला, जालना, छत्रपती संभाजी नगर अशा अनेक जिल्ह्यातून शिवभक्त आले होते.तसेच सदर मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रतिष्ठान च्या सचिव अस्मिता डिसले, उपाध्यक्ष वैभव माने, कार्याध्यक्ष श्याम नानोटे यांनी विशेष सहकार्य केले.