नागरिकांमधून संतापाचे वातावरण
| पनवेल । वार्ताहर ।
खारघर शहरातील रस्त्यांकडे सिडको आणि कंत्राटदारांनी दुर्लक्ष केल्यामुळे जागतिक कीर्तीचे हे शहर खड्ड्यांमध्ये सापडले आहे. प्रवेशद्वारांपासून सुरू झालेली खड्ड्यांची ही मालिका उत्सव चौक, मेट्रो उड्डाणपुलाखालील भाग, गोल्फ कोर्ससमोरील रस्ता, शिल्प चौक, अपना बाजार, संजीवनी इंटरनॅशनल स्कूल ते रांजणपाडा गावापर्यंत गेली असल्यामुळे संपूर्ण शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे.
पनवेल महापालिकेच्या हद्दीतील आणि सिडकोने तयार केलेल्या नोडपैकी सर्वांत मोठा व जागतिक प्रकल्प असणारा हा एकमेव नोड आहे. सायन-पनवेल महामार्गापासून ते अगदी पनवेल-मुंब्रा-शिळफाटा रस्त्यापर्यंत शहराच्या सीमा विखुरलेल्या आहेत. हा नोड जेव्हा सिडकोने वसवला, तेव्हा उच्च दर्जाचे रस्ते अशी या शहराची ओळख होते. आता मात्र रस्त्यांवरील खड्ड्यांनी जागा घेतली आहे. कधी नव्हे, ते उत्सव चौकापासून थेट गोल्फ कोर्सपर्यंतच्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. शहराच्या प्रवेशद्वारावर हिरानंदानीसमोरील दोन्ही दिशेच्या रस्त्यांवर चारचाकीचे अर्धे चाक बुडेल एवढी मोठी खोली खड्ड्यांनी गाठली आहे. तसेच शिल्प चौकालाही खड्ड्यांनी घेरले आहे. अपना बाजार, गावाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्ता खड्डेमय झाला आहे. त्याचबरोबर खारघरमधील जी.डी. पोळ दंत महाविद्यालय आणि बालभारती शाळेसमोरील रस्त्यावरही मोठे खड्डे पडले असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.
हस्तांतर झाल्यामुळे दुरुस्ती वार्यावर
खारघर शहरात सुमारे 100 किलोमीटर अंतराचे रस्ते आहेत. मार्च ते एप्रिल महिन्यात सिडकोने इतर नागरी सुविधांसोबत हे रस्तेही पनवेल महापालिकेला हस्तांतरित केले आहेत; परंतु या रस्त्यांची देखभाल व दुरुस्ती करणार्या कंत्राटदारांची मुदत 15 सप्टेंबरपर्यंत असल्याने या रस्त्यांची जबाबदारी सिडकोवर असून दुरुस्ती व देखभालीचे पैसे पनवेल महापालिकेकडून वसूल करण्यात येणार आहेत; पण असे असताना सिडकोचे रस्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.
पनवेल महापालिकेतर्फे खारघरचे रस्ते देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी निविदा तयार करण्याचे काम सुरू आहे. हे काम येत्या काही दिवसांत झाल्यानंतर निविदा सादर केली जाईल.
संजय कटेकर,
सहशहर अभियंता, पनवेल महापालिका
खारघरमधील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदारामार्फत कोल्डमिक्स टाकून दुरुस्तीचे काम सुरू आहे. पावसामुळे कामात व्यत्यय येत असल्याने दुरुस्ती पूर्ण होण्याआधीच खड्डे पडत आहेत. सिडकोतर्फे रस्तेदुरुस्तीचे काम सुरू आहे.
गिरीष रघुवंशी,
कार्यकारी अभियंता, खारघर, सिडको