माजी आमदार धैर्यशील पाटील यांचे प्रतिपादन
। पेण । वार्ताहर ।
ज्या लोकप्रतिनिधींना आमदार म्हणून निवडून दिले आहे त्यांच्यापेक्षा जास्त विकासाची कामे या मतदारसंघामध्ये शेकापक्षाच्या माध्यमातून केली जात आहेत. शेकापक्ष हा विकासकामे करण्यासाठी कटीबद्द आहे, असे प्रतिपादन माजी आ. धैर्यशील पाटील यांनी केले. कांदळे ग्रामपंचायत अंतर्गत रस्त्याचे व गटारांचे काँक्रिटीकरणाचे उद्घाटन माजी आ.धैर्यशील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्षी अॅड. निलीमा पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे (हरि ओम), पेण विधानसभा चिटणीस प्रसाद भोईर, तालुका चिटणीस संजय डंगर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती परशुराम पाटील, कार्यालयीन चिटणीस संदेश ठाकूर, लाल ब्रिगेडचे अध्यक्ष स्वप्निल म्हात्रे, मंगेश दळवी, अंतोराचे सरपंच अमित पाटील, नगरसेवक शोमेर पेणकर, संतोष पाटील आदी उपस्थित होते.
आमदार नसलो तरी 90 हजार लोकांचे प्रतिनिधीत्व करत आहोत. त्यामुळे विकासकामे करणे ही जबाबदारी आहे. कोरोनाच्या काळात सर्वांनीच विश्रांती घेतली. निवडून दिलेले नेते जनतेसाठी काय करत आहेत. ज्यांना संधी मिळाली, त्यांनी काम करणे गरजेचे होते. परंतु असे झाले नाही.
विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही. यासाठी सर्वपरी प्रयत्न करणार असून वेळ आल्यास मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निधी आणू. 10 वर्ष विधीमंडळाचा सदस्य राहिल्याने खात्रीने सांगतो की, निधीच्या बाबतीत कुणीही नकार देणार नाही. त्यामुळे आपला आमदार नाही तर विकासनिधी कसा मिळेल, याबाबत सर्वांनी निश्चिंत रहा, असेही धैर्यशील पाटील यांनी सांगितले.
कांदळे सरपंच मुरलीधर भोईर, उपसरपंच अविनाश भोईर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. तर, ग्रामस्थांनी ढोलताशाच्या गजरात स्वागत रॅली काढली.