। मुंबई । प्रतिनिधी ।
शिवसेना आणि दसरा मेळावा असे अतूट नाते असून कुणी कितीही संभ्रम निर्माण करु देत, शिवतीर्थावर शिवसेनेचाच दसरा मेळावा होणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले आहे.
विश्व हिंदू परिषदेचे नेते उद्धव कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.
दसरा मेळावा कुणाचा होणार यावरुन कोणताही संभ्रम नाही. संभ्रम निर्माण करणार्यांनी तो खुशाल करावा. शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार. राज्यातील तमाम शिवसैनिकांनी दसरा मेळाव्याला येण्याची तयारी सुरु केली आहे. महापालिकेची परवानगी हा तांत्रिक मांत्रिक भाग..ते नंतर बघू, पण दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्येच होणार, असे ठाकरे यांनी सांगितले.