। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सिडकोने 26 जानेवारीला सहा हजार घरांची विक्री प्रक्रिया राबवली होती. त्यांनतर आता आठ महिन्यांनंतर तळोजा, खारघर, द्रोणागिरी आणि कळंबोली येथे 4,158 घरांचा गणेशोत्सव धमाका जाहीर केला आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी 3,754 आणि पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 404 घरांची विक्री बुधवारपासून सुरू करण्यात आली आहे. या सदनिकांसह 245 गाळे आणि सहा कार्यालये भाडेतत्त्वावर दिली जाणार आहेत.
केंद्र सरकारच्या सर्वांसाठी घरे उपक्रमांअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार सिडकोने 1 लाख 6 हजार घरांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी वेगात घरांचे बांधकाम केले जात आहे. अल्प उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी ही घरे बांधली जात असून हे उद्दिष्ट गाठण्यासाठी सिडकोने गणेश चतुर्थीचे औचित्य साधून विविध गृहसंकुलांतील सदनिका उपलब्ध करून दिल्या आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी महागृह निर्मितीला चालना दिली असून त्यामुळे सिडको सातत्याने घरे, भूखंड, दुकाने आणि कार्यालयांची (कमर्शियल प्रीमाइसेस) विविध योजनांद्वारे समाजातील सर्व घटकांना विक्री करत आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नवीन उत्पन्न मर्यादा सहा लाख रुपये, तर अनुदानाची रक्कम अडीच लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. या गृहयोजनांच्या सविस्तर माहितीकरिता https://www.cidco.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.