। माथेरान । वार्ताहर ।
माथेरानच्या डोंगरात एका दगडावर स्थानिक कलाकारांनी आपल्या कलाकुसरीने निर्माण केलेला निसर्गराजा गणपतीभक्तांचेच नव्हे तर पर्यटकांचेहीदेखील आकर्षण ठरतो आहे. डोंगराच्या कपारीत आणि खोल दरीच्या बाजूला 35 फूट उंचीचा गणपती प्रामुख्याने ट्रेकर्सला आपल्याकडे खुणावतो. दरम्यान, 2005 पासून येथे निसर्गराजा गणपती उभारण्याचे काम सुरू असून त्यात अनेक बदल करून भव्यदिव्य निसर्गराजा गणपती उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे.
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनच्या इंजिनाचे सारथ्य म्हणून अनेक वर्षे धुरा वाहणारे नेरळ येथील स्वर्गीय राजाराम खडे यांना माथेरानवरून नेरळकडे येतांना एक कडा नेहमी खुणावत असे. साधारण 47 ते 50 फूट उंचीच्या या कड्याच्या नैसर्गिक आकारामुळे मिनीट्रेन घेऊन जातांना आणि येतांना प्रवासात त्यांचे हात आपोआप जोडले जात. 2005 मध्ये माथेरानच्या डोंगरात ज्यावेळी प्रचंड भूस्खलन झाले, त्यावेळी मिनीट्रेन बंद पडली होती. तेव्हा मिळालेल्या वेळेचा उपयोग करत त्या दगडाच्या कड्यावर खडे पोहचले. तेथे काळ्या पाषाणातील दगडाला लोखंडी पत्र्याच्या साहाय्याने गणपतीच्या तोंडाचा आकार देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी खडी आणि सिमेंट यांच्या सहाय्याने हात तयार केले. त्या चार हातात गणपती बाप्पाची चार आयुधे देण्यात आली. बाप्पाचा आकार आल्याचे लक्षात येताच राजाराम खडे यांनी सहकारी विश्वनाथ भोसले आणि राजीव शिंदे यांच्या मदतीने गवंडी काम करून निसर्गराजा गणपती म्हणजे कड्यावरचा गणपती घडविला. ही सर्व कामे करतांना राजाराम खडे यांनी लोखंड, सिमेंट, वाळू, खडी आदी वस्तूंची नेरळ-माथेरान घाट रस्त्याने तसेच मिनीट्रेन सुरू झाल्यानंतर मिनीट्रेनमधून नेऊन पूर्ण केले.
मोदक आणि उंदीरमामा
47 मीटरच्या दगडी कड्याला गणेशाच्या भक्तीमुळे आकार देण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर राजाराम खडे यांनी पुढे गणेशापुढे मोदक असावा म्हणून, तब्बल साडेपाच फूट उंचीचा आणि एका व्यक्तीच्या कवेत येणार नाही एवढा मोठा मोदक सिमेंटच्या सहाय्याने तयार केला. या निसर्गराजा गणपतीच्या बाजूला एक कमी जाणवत असल्याचे तेथे भेट देणारे आवर्जून सांगायचे. अगदी लहान आकाराचा असलेला उंदीरमामा हा देखील मोठा असावा या हेतूने खडे यांनी तब्बल सात फूट उंचीचा उंदीर मामा बनविला. एखाद्या व्यक्तीच्या उंचीपेक्षा मोठ्या आकाराचा उंदीरमामा ही गोष्ट निसर्गराजा गणपती येथे शक्य झाली आहे.
त्या कड्यावरच्या गणपतीला रंगरंगोटी करण्यासाठी अडचण निर्माण होऊ नये म्हणून लोखंडी शिड्या बनविण्यात आल्या आहेत. नेरळ ममदापूर येथील बाळू कारले यांनी त्या परिसराला आणि कितीही दूरवरून पाहिले तरी आकर्षक दिसेल असे रंगकाम पूर्ण केले आहे. त्यामुळे मिनीट्रेनमधून प्रवास करणारा प्रत्येक पर्यटक त्या दगडात कोरलेल्या गणेशाच्या मूर्तीचे कौतूक करत असतात. कड्यावरच्या गणपतीपासून काही अंतरावर असलेल्या पेब म्हणजे विकटगडावर अनेक ट्रेकर्स येतात. हे ट्रेकर्स मोठ्या संख्येने कड्यावरच्या गणपतीला भेट देतात. दुसरीकडे हौशी पर्यटक आणि ट्रेकर्स हे आवर्जून निसर्गराजा गणेशाची भेट घेण्यासाठी येत असतात. तेथे पोहोचण्यासाठी किमान चार किलोमीटरचे अंतर नेरळ-माथेरान मिनीट्रेच्या मार्गात चालत जावे लागते.