। नवीन पनवेल । वार्ताहर ।
खारघर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास आलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने पोलीस ठाण्यात गोंधळ उडाला. एकाच कुटुंबातील दोन गटात झालेला वाद पोलिसांपर्यंत गेला होता. यात एकाला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस पैसे मागणारे पोलीस असल्याचा थेट आरोप नातेवाईकांनी केला होता. याबाबतचे आरोप पोलिसांनी फेटाळून लावले होते.
रामसिंग चव्हाण असे मयत व्यक्तीचे नाव आहे. चौहान हे मूळ अमरावतीचे असून पोटापाण्यासाठी खारघर येथे अनेक वर्षांपासून राहतात. त्यांच्याच भावकितील काही लोकांशी त्यांचा वाद झाला. यात दोन गट पडले. हा वाद एवढा विकोपाला गेला की, दोन्ही गटांनी पोलीस ठाणे गाठले. याबाबत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी अचानक रामसिंग चक्कर येऊन पडले. त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी उपचार होणे शक्य नसल्याने त्यांना एम.जी.एम. रुग्णालयात नेण्यात आले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.





