| पनवेल । वार्ताहर ।
खारघरमधील तळोजा येथील मध्यवर्ती तुरुंगातील कैद्यांना भेटण्यासाठी येणार्या नातेवाईकांना उन्हातान्हात कुठेतरी झाडाखाली बसून आपल्या प्रियजनाची वाट पाहत तिष्ठत बसावे लागत होते. सदर प्रकार गॅलेक्सी कंपनीचे सीएसआर प्रमुख आदर्श नय्यर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी कारागृहाबाहेर सीएसआर फंडातून एका वेळेस शंभर लोक बसतील एवढे मोठे प्रतिक्षालय उभे केले आहे. या प्रतिक्षालयाचे उद्घाटन तरुण भार्गव, तुरुंग अधीक्षक यु, टी. पवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अमित कक्कर सुब्रमण्यम, डॉ. अजित मगदूम, वृषाली मगदूम, मंजू नय्यर जनार्दन म्हात्रे, पोलीस अधिकारी, आदि उपस्थित होते.
गॅलेक्सी कंपनीचे सीएसआर प्रमुख आदर्श नय्यर यांनी देशभरात तीन हजार ठिकाणी सीएसआरच्या माध्यमातून लोकोपयोगी प्रकल्प हाती घेऊन ते पूर्ण केले आहेत. नय्यर यांनी तुरुंग अधीक्षक पवार यांची भेट घेतली होती. यावेळी पवार यांनी त्यांना परवानगी देऊन योग्य जागा दाखविल्यानंतर नय्यर यांनी काही महिन्यांमध्ये एका वेळेस शंभर लोक बसतील एवढे मोठे प्रतिक्षालय उभे केले आहे. प्रतिक्षालयात येणार्या अभ्यागतांना आत्मिक शांती मिळावे यासाठी तेथील भिंतीवर चित्रकार शितल म्हात्रे यांची काही बोध प्रधान चित्रे आणि सुविचार देखील काढण्यात आली आहेत. 1500 कैद्यांची क्षमता असलेल्या तळोजा कारागृहात 3000 पेक्षा जास्त कैदी आहेत. त्यांना भेटायला रोज 350 व्यक्ती याप्रमाणे वर्षाकाठी एक लाख लोक दूरवरुन येत असतात. प्रतिक्षालय उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर या परिसरात उपस्थितांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.