बंदरातून तस्करी सुरूच
। उरण । वार्ताहर ।
जेएनपीए बंदरातून रक्तचंदनाही तस्करी होत असल्याचे उघड होत आहे. पुन्हा एकदा रक्तचंदनाचा साठा जप्त करण्यात आला आहे. यावरून जेएनपीए बंदरातून तस्करीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. दुबईतील जेबेल अली बंदरात निर्यात करण्यात आलेल्या संशयित कंटेनरमधून अडीच कोटींचे तीन मेट्रीक टन रक्तचंदन जेएनपीटी सीमा शुल्क विभागाच्या सीआययूने जप्त केले आहे.
जेएनपीए बंदरातून दुबईत निर्यात केलेल्या मालाच्या कंटेनरबाबत सिमा शुल्क विभागाला संशय आला होता. त्यामुळे केंद्रीय गुन्हे पथकाने हा कंटेनर दुबईहून परत मागविला होता. त्या कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये निर्यात करण्यात आलेला सुमारे तीन मेट्रिक टन रक्तचंदन सापडले आहे. यापूर्वी ही गेल्या महिन्यात कोट्यवधी रुपयांचा रक्तचंदन साठा पकडण्यात आला होता. त्यानंतर महिना भरातच पुन्हा एकदा रक्तचंदन साठा सापडल्याने जेएनपीए बंदरातून रक्तचंदनाची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असूनही जेएनपीए प्रशासन याबाबत ठोस उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही. यावरून जेएनपीए प्रशासनाच्या काही अधिकारी वर्गाचेही आर्थिक हितसंबध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
जेएनपीए बंदर सुरू झाल्यापासून तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे. यापूर्वी रक्तचंदन व इतर तस्करीच्या घटना घडून त्यांच्यावर कारवाई ही करण्यात आल्या आहेत. यावेळी काही तस्करांच्या साथीदारांना अटकही करण्यात आलेली आहे. मात्र रक्तचंदन व इतर तस्करी करणाऱ्या तस्करांच्या मुलापर्यंत जाऊन कारवाई करण्यात यश येताना दिसत नाही. त्यामुळे आजही जेएनपीए बंदरातून होणारी मग ती रक्तचंदन असो व इतर तस्करी रोखण्यात यश येण्याऐवजी ती सुरू असल्याचे दिसून येत आहे. भविष्यात या भागाचा औद्योगिक विकास झपाट्याने होत आहे. त्यामध्ये नवी मुबंई आंतरराष्ट्रीय विमानतळ व उरण रेल्वे स्टेशन सुरू होणार असल्याने तस्करांना सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे भविष्यात जेएनपीए बंदरातून मोठ्या प्रमाणात तस्करी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.