| पनवेल । वार्ताहर ।
पनवेल महापालिकेला आवश्यक असलेल्या 1,043 पदांच्या सेवा प्रवेश नियमास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या मंजुरीमुळे महापालिकेमध्ये काम करणार्या अनेक कर्मचार्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
1 ऑक्टोबर 2016 मध्ये पनवेल महापालिकेची स्थापना झाल्यानंतर महापालिकेच्या आस्थापना विभागाने सेवा प्रवेश नियम तयार केले होते. त्यास महासभेत मंजुरीही मिळाली होती. सदर सेवा नियम शासन मान्यतेसाठी पाठविण्यात आले होते. आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त विठ्ठल डाके आणि सहाय्यक आयुक्त सुवर्णा दखणे, आस्थापना विभाग प्रमुख नामदेव पिचड यांनी केलेल्या अथक प्रयत्नांनंतर अखेर शासनाने हा प्रस्ताव मंजूर केला आहे. या प्रस्तावानुसार महापालिकेच्या प्रशासकीय व तांत्रिक पदांच्या सेवा प्रवेश नियमास मान्यता मिळाली आहे. या प्रस्तावामध्ये प्रशासकीय सेवा, लेखा सेवा, लेखा परिक्षण सेवा, तांत्रिक सेवा, वैद्यकीय सेवा, निम-वैद्यकीय सेवा, सार्वजनिक आरोग्य सेवा, अग्निशमन संवर्ग आणि सेवा या अंतर्गत येणार्या अधिकारी गट ‘अ’, गट ‘ब’ आणि कर्मचारी गट ‘क’, गट ‘ड’ यांमध्ये येणार्या 1,043 मंजूर पदांपैकी रिक्तपदांची बिंदू नामावलीनुसार भरती करण्यात येणार आहे.