| माथेरान | वार्ताहर |
माथेरानच्या प्रा. शांताराम यशवंत गवाणकर शाळेच्या मुलींनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत उज्ज्वल कामगिरी केली असून, त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
प्रा. शांताराम यशवंत गवाणकर शाळेच्या मुलींनी कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या तालुका अॅथलेटिक्स स्पर्धेत 100 मीटर धावणे यामध्ये 17 वर्षांखालील मुलींच्या गटात हर्षाली ढेबे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक, तर 14 वर्षाखालील वयोगटात प्राजक्ता कदम या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांना जिल्हा पातळीवर खेळण्याची संधी मिळाल्याचे मुख्याध्यापिका कल्पना पाटील यांनी सांगितले. या स्पर्धेसाठी त्यांना माजी शिक्षक सुनील शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शाळेतील शिक्षक संघपाल वाटोरे यांनी स्पर्धेच्या प्रवेशिका दाखल करणे आणि स्पर्धेच्या ठिकाणी सर्वच विद्यार्थ्यांना घेऊन जाणे असे महत्त्वपूर्ण काम पाहिले. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.