ग्रामीण भागात शेतकर्यांची मागणी
। रसायनी । वार्ताहर |
कोकणातील बहुतेक शेतकरी शेती करीत असल्याने घाट माथ्यावरील मेंढपाळ आपल्या मेंढ्या घेऊन घाटमाथ्यावरून खाली उतरले असून त्यांच्याबरोबर घोडे, मेंढ्या, कोंबड्या, राखणीसाठी कुत्रे असा लवाजमा असून लहान मुलेही कडेवर दिसत आहेत. सध्या शेती कापणी झाल्याने मेंढपाळ भात कापलेल्या शेतामध्ये आपले ठाण मांडत आहे.या मेंढ्यांच्या विष्ठेपासून शेतकर्याला मोठ्या प्रमाणात खत मिळत असल्याने यामुळे जमिनीचा कस वाढण्यास मदत होत असते. शिवाय काही जागामालक मेंढपाळ व्यावसायिकांना पैसेही देत असल्याने रोजगारही उपलब्ध होत असल्याचे मेंढपाळाने सांगितले.
सध्या ग्रामीण भागाच्या ठिकाणी शेतकरी मेंढपाळांचे स्वागत करीत असल्याचे दृश्य आपणास पहावयास मिळत आहे. भातशेती कापली की कापलेल्या जागी नवीन गवत उगवत असतात. हेच कोवळे गवत मेंढ्यांचे खाद्य असते. तसेच पावसाच्या पाण्यावर अनेक प्रकारच्या काटेरी वनस्पती निर्माण होत असतात. या काटेरी वनस्पतींपासून मेंढ्यांना सकस आहार मिळत असतो. तर मेंढ्यांपासून लोकर, मांस आणि कातडी तर मिळतेच. शिवाय मेंढ्यांना शेतात बसवून खत मिळवता येते. यामुळे कोकणात आम्हाला जागोजागी मागणी असल्याचे मत व्यक्त केले.