दारुच्या बाटल्या प्लास्टिक ग्लासांचा खच; प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष
| पनवेल | प्रतिनिधी |
नवीन पनवेल शहरातील सेक्टर 12 येथील बसस्थानक रात्रीच्या वेळी मद्यपींचा अड्डा बनले असून, या बसस्थानकात दारूच्या बाटल्या तसेच सर्वत्र प्लास्टिक ग्लासांचा खच पडल्याचे चित्र पहायला मिळत आहे. परंतु, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रवाशांमधून संताप व्यक्त होत आहे.
या बसस्थाकातील रस्त्यावर कचर्याचे ढीग असून, परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे प्रवाशांना नाक धरुन उभे राहावे लागत आहे. तसेच रस्त्यावरील स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे या परिसरात रात्री रिक्षाचालक, दुचाकी वाहनधारक याचा गैरफायदा घेत सदर जागेत मद्यप्राशन करीत असतात. त्यामुळे या परिसरात दारुच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसतो. तसेच या परिसरात बेकायदेशीर ढाबे सुरू झाले आहेत. यामुळे सेक्टर 12, 13 येथील महिलांना रात्रीच्या वेळी या रस्त्यावरून ये-जा करणे धोकादायक बनले आहे. या मद्यप्राशन करणार्या मद्यपींवर कडक कारवाई करण्याची मागणी येथील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.