खा. तटकरे यांचा गौप्यस्फोट
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
आरसीएफच्या विस्तारित प्रकल्पाची जनसुनावणी वेळेत झाली नाही तर तो प्रकल्प गुजरातला जाईल असे संबधीत खते व रसायन मंत्री मनसूख मांडवीया यांनी आपल्याला सांगिल्याचा गौप्यस्फोट खा. सुनील तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
आरसीएफच्या पीआर /पीएन तंत्रज्ञानावर आधारित नवीन 1200 एमटीपीडी (डीएपी आधार) एनपीके / डीएपी कॉम्प्लेक्स फर्टिलायझर प्लांट उभारण्याच्या विस्तारीत प्रकल्पाची पर्यावरण विषयक जनसुनावणी 15 नोव्हेबर रोजी अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील हॉटेल साई-इन येथे आयोजित करण्यात आली होती. परंतु स्थानिकांचा विरोध असून सुनावणीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन शकतो असे कारण देऊन ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. सदर जनसुनावणी चुकीच्या पद्धतीने पुढे ढकलण्यात आल्याचा आरोप यावेळी स्थानिकांनी केला होता. त्यानंतर या प्रकल्पाची जनसुनावणी निर्धारित वेळेत पुर्ण झाली नाही आणि आवश्यक ते सहकार्यक मिळाले नाही, तर हा प्रकल्प गुजरातला जाईल अशी माहिती आपल्याला संबंधीत केंंद्रीय मंत्र्यांनी दिल्याचे सुनील तटकरे म्हणाले. हा प्रकल्प थळ येथेच होण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने आवश्यक असलेली जमीन देखील उपलब्ध आहे. या प्रकल्पातून न्यायालयाच्या अधिन राहून प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न देखील सुटू शकतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
खा. सुनिल तटकरे यांनी शुक्रवारी अलिबाग येेथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना त्यांनी सरकारवर निशाना साधला. एक वर्ष उलटूनही स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका झालेल्या नाहीत. घटनेनुसार सत्ता कार्यकाळ संपल्यानंतर निवडणूका होणे गरजेचे असते. अत्यंत आणिबाणी प्रसंगी सहा महिन्यासाठी प्रशासकामार्फत काम पाहीले जावू शकते मात्र सरसकट सत्तेच्या चाव्या प्रशासनाच्या हातात देणे नियमबाह्य आणि लोकशाहीसाठी घातक असल्याचे खा. सुनिल तटकरे यांनी म्हटले आहे.
यावेळी त्यांनी पंतप्रधान सडक योजनेच्या कामांची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. गेल्या तिन वर्षांत जिल्ह्यातील या योजनेतील सर्व कामे थांबवण्यात आली होती. ही काम मंजूर करण्यासाठी राज्यातील 35 खासदारांनी केंद्रीय मंत्री निरंजनादेवी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ही कामे मंजूर करवून घेतल्याचे सांगितले. यावेळी ग्रामविकास राज्य मंत्री कपील पाटील हेदेखील उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील अलिबागसह 11 तालुक्यांत पंतप्रधान सडक योजनेतील 61 किलोमिटरचे रस्ते मंजूर झाले आहेत. यासाठी 48 कोटी 62 लाख रुपये मंजूर झाले असल्याचे खा. तटकरे यांनी सांगितले. हि कामे खांसदारांनी केलेल्या शिफारीसीनंतर मंजूर करण्यात आली आहेत. 1 फेबु्रवारीला केंद्राचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पुन्हा उर्वरीत कामांची मांगणी करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मुंबई-गोवा महामार्ग, पाली रोड, अलिबाग-मुरुड आणि अलिबाग रोहा रस्त्याच्या कामांबाबत पत्रकारांनी काही प्रश्न उपस्थित केलेे. तसेच मेडीकल कॉलेजच्या कामाला होणारा विलंब, तसेच आरसीएफ कंपनीच्या जनसुनावनीबाबतही प्रश्न पत्रकारांनी खा. तटकरे यांना विचारले. यावर, आरसीएफची जनसुनावणी वेळेत झाली नाही तर तो प्रकल्प गुजरातला जाईल असे संबधीत मंत्र्यांने आपल्या सांगिल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक आणि पीएपींचा प्रश्न हाताळतानाच प्रकल्प जाणार नाही याची काळजी घेतली पाहीजे. तशा सुचना मी केल्या असल्याचे खा. तटकरे यांनी सांगितले. रस्ते रखडलेत हे खरे आहे परंतू, मोठे रस्ते बहुतांशी पुर्ण होत आले आहेत. येत्या काळात हे काम पुर्ण होईल अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली. अलिबाग येथील मेडीकल कॉलेजचे कामही कुठल्याही परिस्थितीत थांबणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले.
बाळाराम पाटील यांचा विजय निश्चित
शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांच्यापुर्वी कोकण शिक्षक मतदारसंघावर सुरुवातीपासून भाजपाचे वर्चस्व होते. मात्र मागिल निवडणूकी पुरोगामी विचारांच्या सर्व पक्षांनी एकत्र येत भाजपाचा पाडाव करीत शेकापक्षाच्या बाळाराम पाटील यांना निवडून आणले. या निवडणूकीत देखील महाविकास आघाडी म्हणून बाळाराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिक्षक मतदारंसघाचे उमेदवार म्हणून बाळाराम पाटील यांनी चांगले काम केले आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास देखील यावेळी खा. सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.