एमएसआरडीसीचे दुर्लक्ष
नागरिकांकडून संताप व्यक्त
| पाली | वार्ताहर |
वाकण-पाली महामार्गाचे काम पूर्णत्वास आले असून, साईडपट्टीचे काम सुरू आहे. साईडपट्टीच्या कामासाठी नाल्यातील राडारोडा वारण्यात येत असल्याचे चित्र आहे. परंतु, याकडे एमएसआरडीसीचे सपशेल दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांसह नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
वाकण-पाली महामार्गाच्या डांबरीकरणासह रुंदीकरणाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या अधिपत्याखाली ठेकेदाराकडून गेली सहा वर्षांपासून सुरू आहे. हे काम आता पूर्णत्वास आले असून, या रस्त्याच्या साईडपट्टीचे काम ठेकेदारामार्फत युद्धपातळीवर सुरू आहे. या साईडपट्टीसाठी मुरूम किंवा इतर चांगल्या दर्जाची माती वापरणे गरजेचे असतानादेखील काही ठिकाणी अक्षरशः नालेसफाईतून काढण्यात येणार्या प्लास्टिकसह इतर राडारोडा वापरण्यात आल्याचे चित्र एकलघरसमोरील रस्त्याच्या साईट पट्टीवर दिसत आहे. ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचा मातीचा वापर होत असतानादेखील एमएसआरडीसी मात्र गप्प का, असा सवाल प्रवासीवर्गासह सुज्ञ नागरिकांकडून विचारला जात आहे.
वाकण-पाली-खोपोली महामार्गाचे अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे झालेले असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवूनदेखील एमएसआरडीसी मात्र ठेकेदारावर मेहरबान? हे न सुटणारे कोडे आहे. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधीदेखील डोळ्यावर झापड बांधून बसलेत? – रवींद्रनाथ ओव्हाळ, सामाजिक कार्यकर्ते, सुधागड