वार्षिक करारारतून डच्चू
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारतीय खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे बीसीसीआय दरवर्षी वार्षिक कराराची यादी जाहीर करते. बोर्डाने 26 मार्चला 2022-23 या वर्षासाठी वार्षिक कराराची यादी प्रसिद्ध केली. या यादीत अनेक बदल अपेक्षित होते आणि तेच झाले. अनेक खेळाडूंची चांदी झाली तर अनेकांना निराश व्हावे लागले. या यादीतून 7 खेळाडूंना वगळले आहे. आता त्यांच्या कारकिर्दीवर संकटाचे ढग निर्माण झाले आहेत.
बीसीसीआयने यंदाच्या वार्षिक कराराची यादी जाहीर करताच या यादीतून 7 भारतीय खेळाडू बाहेर होते. यामध्ये अनेक अनुभवी खेळाडू आहेत तर युवा खेळाडूंचाही या यादीत समावेश आहे. अजिंक्य रहाणे, वेगवान गोलंदाज इशांत शर्मा, वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार, यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा, फलंदाज हनुमा विहारी, सलामीवीर मयंक अग्रवाल आणि अष्टपैलू दीपक चहर यांचा समावेश नाही. बीसीसीआयने या खेळाडूंना यंदाच्या करार यादीतून वगळले आहे. बोर्डाने सात खेळाडूंना यादीतून काढून टाकल्याने आता त्यांच्या कारकिर्दीवर प्रश्न निर्माण झाले आहेत. या खेळाडूंनी बराच काळ संघासाठी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. अशा परिस्थितीत आता या खेळाडूंची कारकीर्द धोक्यात आली आहे. इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर आणि हनुमा विहारी दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. मात्र या खेळाडूंनी दीर्घकाळ संघासाठी एकही सामना खेळलेला नाही, तर साहाने आधीच सांगितले आहे की संघात संधी मिळणे खूप कठीण आहे. रहाणेलाही जानेवारी 2022 पासून संघात संधी देण्यात आलेली नाही.
मयंकचे पुनरागमन शक्य
संघामध्ये स्थान न मिळाल्याने मयंक अग्रवालने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप धावा केल्या. मयंकने धमाकेदार कामगिरी करताना धावांचे तुफान आणले होते. त्याने 900 हून अधिक धावा केल्या होत्या आणि द्विशतकही केले होते. त्याची कामगिरी पाहता त्याला संघात परत आणले जाऊ शकते.