| मुंबई | प्रतिनिधी |
केदारनाथ मंडळ, जयभारत मंडळ, ओम कल्याण, गुड मॉर्निंग स्पोर्टस्, अंकुर स्पोर्टस्, लायन्स स्पोर्टस्, शिवशंकर मंडळ, बंड्या मारुती यांनी बजरंग मंडळाने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या पुरुष गट सुवर्ण चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला.
ना.म. जोशी मार्ग येथील श्रमिक जिमखाना येथे सुरू असलेल्या पुरुषांच्या क गटात उपनगरच्या केदारनाथने ओम पिंपळेश्वरला 33-31 असे तर त्यानंतर झालेल्या सामन्यात जय भारतला 25-25 असे बरोबर रोखत बाद फेरीतील आपला प्रवेश निश्चित केला. याच गटात जय भारतने देखील ओम पिंपळेश्वरचा 39-36 असा पराभव करीत बाद फेरी गाठली.
अंकुर स्पोर्टस्ने ब गटात पालघरच्या आई अष्टभुजाचा 30-10 असा सरळ पाडाव करीत साखळीतील दुसर्या विजया बरोबर बाद फेरी गाठली. गुड मॉर्निंगने ग गटात अशोक मंडळाचा 38-17 असा पराभव केला. ठाण्याच्या ओम कल्याणने इ गटात लायन्स स्पोर्टस् चा 31-29 असा तर अगोदर झालेल्या सामन्यात श्रीराम कबड्डी संघाला 34-34 असे बरोबरीत रोखत बाद फेरीत प्रवेश केला. बंड्या मारुतीने ड गटात उपनगरच्या स्वस्तिक मंडळावर 28-19अशी मात करीत आगेकूच केली.