आगामी मालिकेसाठी संघात मोठे बदल
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शुक्रवारी (दि.13) भारतीय महिला संघाची आगामी एकदिवसीय आणि टी-20 मालिकांसाठी घोषणा केली आहे. भारतीय महिला संघाला 15 डिसेंबरपासून वेस्ट इंडिज महिला संघाविरुद्ध मायदेशात 3 सामन्यांची एकदिवसीय आणि 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळायची आहे. भारत आणि वेस्ट इंडिज महिला संघात 15, 17 व 19 डिसेंबर रोजी नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. तसेच, 22, 24 व 27 डिसेंबर रोजी वडोदरामधील कोटांबी स्टेडियमवर एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.
भारतीय संघ नुकताच ऑस्ट्रेलिया दौर्यावरून एकदिवसीय मालिका खेळून परतला आहे. या एकदिवसीय मालिकेत भारताला व्हाईटवॉशचा सामना करावा लागला. या पराभवानंतर आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी मालिकांसाठी भारताच्या संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. या मालिकांसाठी स्फोटक फलंदाज शफाली वर्माला संधी देण्यात आलेली नाही. तिला ऑस्ट्रेलियाविरुद्धही संधी दिली नव्हती. याबरोबरच अरुंधती रेड्डीलाही संघातून वगळण्यात आले आहे. याशिवाय यष्टीरक्षक नंदीनी कश्यप, फलंदाज राघवी बिस्त आणि अष्टपैलू प्रतिका रावल यांना पहिल्यांदाच भारताच्या महिला संघात संधी देण्यात आली आहे. बिस्त आणि कश्यप यांना भारताच्या टी-20 संघात संधी दिली आहे, तर रावलला एकदिवसीय संघात संधी देण्यात आली आहे. तनुजा कंवर हिलाही एकदिवसीय संघात संधी मिळाली आहे.
एकदिवसीय संघः
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रतिका रावल, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, रिचा घोष (यष्टीरक्षक), उमा चेत्री (यष्टीरक्षक), तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, मिन्नू मणी, प्रिया मिश्रा, तनुजा कंवर, तितस साधू , सायमा ठाकोर, रेणुका सिंग ठाकूर.
टी-20 संघः
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), नंदिनी कश्यप, जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टीरक्षक), उमा चेत्री (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, सजना सजीवन, राघवी बिस्त, रेणुका सिंग ठाकूर, प्रिया मिश्रा, तितस साधू, सायमा ठाकोर, मिन्नू मणी, राधा यादव.