| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान हे डोंगरावर वसलेले गाव असून या माथेरानच्या जंगलातील झाडे हि वर्षभर वेगवेगळा अनुभव देत असतात. प्रामुख्याने वसंत ऋतूमध्ये फुटणारी नवीन पालवी आणि त्यानंतर वेगेवेगळ्या रंगांची छाया माथेरानच्या डोंगरात अनुभवता येते. वसंत ऋतू ते वैशाख या काळातील झाडांमधील बदलाचा अभ्यास माथेरानमधील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक संघपाल वाठोरे यांनी केले आहे.
वसंत पंचमीपासून वसंताला सुरुवात झाली. तेव्हापासून निसर्ग मुक्तहस्ताने रंगांची उधळण करत असताना दिसतो. पळस फुलतो, काटेसावर बहरतो, रानमोगऱ्याची फुले निसर्गाच्या शृंगारात भर टाकतात आणि सुरु होतो जणूकाही जवळपास महिनाभर किंवा त्याहीपेक्षा थोडा अद्धिक काळ निसर्गाचा रंगोत्सव. जिल्ह्यातील निसर्गाचा वरदहस्त लाभलेले, निसर्गवैभवाची मुक्तहस्ताने उधळण झालेले, जगप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या माथेरानच्या डोंगर आणि शिवारामध्ये काटेसावर, रानमोगरा आदी पुष्पवैभव दिमाखात नजरेस पडते, तर त्याच बरोबर अनेक वृक्ष ही आपल्या पूर्ण-फुलांनी आपला अवतार बदलू पाहतात.
निसर्गात अनेक ठिकाणी आपण फुलांच्या वेगवेगळ्या रंगछटा, त्याचे वैभव पाहत असतो. सध्या असच काहीसं दृश्य माथेरान आणि त्याच्या अवतीभवतीच्या निसर्गात गेल्या काही दिवसांपासून नजरेस पडते आहे. वृक्षांनी आपलं रूपडं पूर्णतः पालटून घेतलेले दिसते आहे. हिरव्या गच्च असणाऱ्या झाडांमधून कोवळी पालवी धारण करून रंगीबिरंगी छटा दिवसागणिक नजरेस पडतात. आज पानझड, उद्या गुलाबी कोवळी पाने, परवा गडद लाल पाने तर पुढे एकेक दिवस आणखी रंग बदलून पुन्हा आपल्या हिरव्या रंगाकडे मार्गक्रमण करत पाने आपली पूर्वावस्था धारण करतात. हा प्रवास निसर्ग प्रेमींसाठी पर्वणी आणि नजरेस सुखावणारा ठरतो.