भावी पोलिसांकडून खंडणी मागणे पडले महागात
| अलिबाग | प्रमोद जाधव |
सेवेत कायम करण्यासाठी परिचारिकांना करोडो रुपयांचा गंडा घालण्याबाबत जिल्हा रुग्णालयत चर्चेत असताना, याच जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्याने भावी महिला पोलिसांकडून वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. 14 महिला उमेदवारांकडून 21 हजार 500 रुपये घेणाऱ्या कर्मचाऱ्याविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, या मागचा खरा सूत्रधार कोण? हे आता लवकरच उघड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील आर्थिक भ्रष्टाचार आता मोठ्या प्रमाणात फोफावत असल्याचे उघड होऊ लागले आहे.
रायगड पोलीस दलातील पोलीस शिपाईसह पोलीस चालक पदासाठी भरती प्रक्रिया पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाली. पोलीस शिपाई पदासाठी 272 व पोलीस चालक पदासाठी सहा अशा एकूण 278 जागांसाठी ही भरती प्रक्रिया तीन जानेवारीपासून सुरु झाली. पोलीस भरती प्रक्रियेत पारदर्शकता राहावी यासाठी वेगवेगळी यंत्रणा तैनात करण्यात आली होती. आमिष दाखविणाऱ्यांवर पोलिसांनी नजर ठेवली होती. मैदानी, लेखी चाचणी परीक्षेनंतर निवड झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. गेल्या दहा मेपासून अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात महिला उमेदवार वैद्यकीय तपासणीसाठी जात होत्या. वेगवेगळ्या प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या झाल्यानंतर अंतिम वैद्यकीय प्रमाणपत्र मिळण्याची आशा असताना कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीचा तिसरा डोस घेतल्याचे प्रमाणपत्र नसल्याने वैद्यकीय प्रमाणपत्र मिळणार नाही, अशी भीती निर्माण झाली होती.
वर्षभर मेहनत घेत पोलीस होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरताना रुग्णालयातील या प्रकारामुळे स्वप्नभंग होण्याचे दिसू लागले. पोलीस होण्यासाठी खेड्यापाड्यातील मुलींनी घेतलेली मेहनत फळाला येण्याची वेळ असताना हा प्रकार घडल्याने महिला उमेदवार रडू लागल्या. या संधीचा फायदा घेत जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी प्रदीप ढोबाळ याने 14 महिला उमेदवारांकडून 21 हजार 500 रुपयांची खंडणी घेतली. ही बाब पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या लक्षात आली. त्यांनी तेथील वॉर्डबॉयला विश्वासात घेऊन पैसे घेतल्याची पडताळणी केली. या पडताळणीत त्याने पैसे घेऊन ढोबाळ यांना दिल्याचे कबूल केले. घटनेचे गांभीर्य ओळखून अलिबाग पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्याप्रकरणी ढोबाळ याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला मंगळवारी दुपारी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. या गुन्ह्याचा तपास अलिबाग पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय जाधव करीत आहेत. खंडणी प्रकरणातील तपासात रुग्णालयातील आणखी काही जणांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.
वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी घेतली जाते खंडणी
अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी वेगवेगळ्या शासकीय कार्यालयातील कर्मचारी अर्ज करतात. परंतु, त्यांना दोन ते तीन महिने बिल मंजूर करण्यासाठी वाट पाहावी लागते. त्यात वेगवेगळ्या त्रुटी काढून बिल नामंजूर करण्याचा प्रकारही घडत आहे. वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी लाच घेतली जाते. त्याचीही चौकशी व्हावी अशी मागणी होऊ लागली आहे.
भरती प्रक्रिया निःपक्ष व पारदर्शक व्हावी यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून यंत्रणा काम करीत आहे. भरतीची शेवटच्या टप्प्यातील प्रक्रिया सुरु आहे. वैद्यकीय तपासणी करणे, चारित्र्य पडताळणी करणे, मुख्य कागदपत्रे तपासणे अशा अनेक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांना नियुक्तीपत्र दिले जाणार आहे. मात्र, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी महिला उमेदवारांकडून खंडणी मागितल्याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याला ताब्यात घेतले आहे.
सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, रायगड पोलीस दल