शेखाडी गावाचं पाणीसंकट गडद
| बोर्लीपंचतन | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी गाव आजही तहानलेले आहे. केंद्र सरकारने प्रत्येकाला पिण्याचे मुबलक पाणी मिळावे म्हणून ‘हर घर जल योजना’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शेखाडीत टँकरने पाणीपुरवठा होत असल्याने, या योजनेतून नक्की अधिकाऱ्यांना फायदा झाला की कंत्राटदाराला हा प्रश्न आता ग्रामस्थ विचारत आहेत.
शेखाडी गाव हे समुद्रलगत आहे. या गावात कित्येक वर्षांपासून पाणीटंचाई आहे. उन्हाळ्यात तर दरवर्षी टँकरने पाणी मागवले जाते. दहा हजार लीटरचा टँकर गावाच्या मूळ गाव शेखाडी, समर्थवाडी व मोहल्ला या भागात तीन दिवसांत एकदाच येतो. त्यामुळे मिळेल ती भांडी भरून ठेवण्यासाठी महिलांची व ज्येष्ठ ग्रामस्थांची मोठी तारांबळ उडते. दिवसा कोणत्याही वेळी टँकर येतो, त्यामुळे दिवसभर वाट पाहावी लागत असल्याचे गावातील महिला सांगतात. नुकत्याच राबवलेल्या जलजीवन मिशनच्या पाणी योजनेनुसार शेखाडी मूळ गावात 155 घरे, शेखाडी मोहल्ल्यात 82, तर शेखाडी समर्थवाडीमध्ये 33 घरे आहेत. शेखाडी गावच्या 270 घरांत साधारणपणे हजारांच्या आसपास लोकसंख्या आहे. या योजनेतून गावात एकूण 268 नळ जोडणी दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात पाहणी केली असता शेखाडी मूळ गावात घरोघरी नळच नसल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.
चार वर्षांत लाखोंच्या योजना
शेखाडी गावात भारत निर्माणमधून 2018-19 मध्ये अडतीस लाखांची पाणी योजना राबविली. मात्र, त्यातून पाणीटंचाई गेली नाही. नुकतीच गावात 62 लाखांची जलजीवन मिशनची पाणी योजना राबवली, तरीदेखील आम्हाला टँकरमधून पाणी मागवावे लागत असल्याचे गाव अध्यक्ष संतोष बांद्रे यांनी सांगितले. विशेष म्हणजे, एकाच कंत्राटदाराला या दोन्ही योजनांची कामे दिली असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
शासनाने पाणी योजना राबविल्या, मात्र स्थानिक पातळीवर टँकरने पाणी आणावं लागते. कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे.
किशोरी केशव खापरे, ग्रामपंचायत सदस्या
ग्रामस्थांना पाण्यासाठी खूप वणवण करावी लागते. आम्ही कार्ले धरणातून पाणी आणण्यासाठी मागणी करत आहोत. शासनाकडून दोन पाणी योजना राबविल्या, पण गावात दीर्घकालीन पाण्याचा स्रोत व पाण्याची वर्षभरात गरज याचे नियोजन हे पूर्ण बिघडले.
बबन पाटील, सरपंच, शेखाडी
अधिकारी मिटिंगमध्ये व्यस्त
जिल्हा परिषदेच्या म्हसळा पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता युवराज गांगुर्डे यांना फोन केला असता मिटिंगमध्ये असल्याचे सांगितले.