अंधकारमय जीवन होणार प्रकाशमान; समाजापुढे ठेवला नवा आदर्श
| अलिबाग | प्रतिनिधी |
‘अनंताच्या पलीकडे जाऊनही अस्तित्व करावं, तुमच्या डोळ्यातूनही कुणी तरी जग बघावं’ या उक्तीप्रमाणे नेत्रदान करुन पूजा प्रमोद झुंजारराव यांनी समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे. या नेत्रदानातून दृष्टीहिनास दिव्यदृष्टी मिळणार असून, अंधकारमय जीवन प्रकाशमान होणार आहे. पूजा यांचे पती प्रमोद झुंजारराव यांनी नेत्रदानाचा संकल्प पूर्ण करीत समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.
पूजा प्रमोद झुंजारराव यांचे दीर्घ आजाराने 15 मे रोजी विद्यानगर येथे राहत्या घरी निधन झाले. निधनसमयी त्या 50 वर्षांच्या होत्या. अलिबाग येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे दशक्रिया विधी व उत्तरकार्य बुधवार, दि. 24 मे रोजी श्रीक्षेत्र संगमेश्वर, ता. मुरबाड, जिल्हा ठाणे येथे होणार आहेत. पूजा झुंजारराव यांच्या पश्चात पती प्रमोद झुंजारराव आणि एक मुलगी असा परिवार आहे. अलिबाग नगरपरिषद माजी नगरसेवक अजय झुंजारराव यांच्या त्या वहिनी होत्या. पीएनपी माध्यमिक शाळा वायशेत येथे अनेक वर्षे लिपिक म्हणून त्या कार्यरत होत्या. मनमिळाऊ आणि कामात तत्पर असणाऱ्या पूजा झुंजारराव यांच्या निधनाची बातमी समजताच पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील आणि संस्थेचे त्यांचे सहकारी यांनी घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.
अत्यंत शोकाकुल वातावरणातसुद्धा त्यांचे पती प्रमोद झुंजारराव यांनी पत्नीचे नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे मित्र मंगेश म्हात्रे यांनी धामणकर हॉस्पिटलशी संपर्क साधून डॉ. राजीव धामणकर आणि डॉ. रिटा यांना विनंती करताच त्यांनी त्वरित झुंजारराव यांच्या घरी जाऊन नेत्र संकलन केले. पूजा झुंजारराव यांचे नेत्रदान करून मृत्यूनंतरही त्यांचे डोळे जिवंत ठेवण्याचा आणि इतरांच्या आयुष्यात नवीन प्रकाश देण्याचा एक अनमोल प्रयत्न केला आहे.