रत्नागिरी, रायगडला रेड अलर्ट
| रायगड | प्रतिनिधी |
भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. प्रशासनाने एनडीआरएफ व एसडीआरएफला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
राज्यात मागील 24 तासामध्ये (15 जून रोजी सकाळपर्यंत) सर्वाधिक पाऊस रत्नागिरी जिल्ह्यात 88.1 मिमी झाला. तसेच पुढील 24 तासांसाठी राज्यातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील 24 तास मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची चिन्हे आहेत.
16 जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट तर ठाणे, मुंबई, घाट पुणे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पालघर, धुळे, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, संभाजीनगर या परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, 17 जून रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट वर्तविण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, धुळे, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, संभाजीनगर या जिल्ह्यांना हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच 18 जून रोजी पालघर, धुळे, ठाणे, मुंबई, अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, संभाजीनगर या भागात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून सातारा, कोल्हापूर, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
पावसाचा जोर वाढणार
राज्यात 20 जूनपर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आहे. तसेच राज्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह उपनगरात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.