| अलिबाग | प्रतिनिधी |
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक पोलिसांनी दणका दिला आहे. एका दिवसात 330 वाहन चालकांविरोधात कारवाई करून त्यांच्याकडून मंगळवारी दिवसभरात 2 लाख 18 हजार 600 रुपयांचा दंड वसुल केला आहे.
रायगड जिल्हा वाहतूक शाखेची स्वतंत्र यंत्रणा आहे. पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षकांपासून सुमारे 90 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. जिल्ह्यात औद्योगिकीरण झपाट्याने वाढत असल्याने नागरिकीकरणदेखील वाढू लागले आहे. गावांसह शहरांचा विस्तार प्रचंड वाढल्याने वाहनांची संख्याही वाढली आहे. दुचाकी वाहनांसह वेगवेगळ्या प्रकारची तीन, चारचाकी व अवजड वाहने रस्त्यावरून धावतात. वाहनांची वर्दळ रस्त्यावर वाढल्याने बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न वाहतूक पोलीस करीत आहेत. तरीदेखील काही महाभाग वाहन चालक वाहतूकीच्या उल्लंघन करीत वाहने चालवित आहेत. त्यामध्ये अपघात होऊन काहींना मृत्यूला सामोरे जावे लागते. तर काहींना जखमी होऊन कायमचे अपंगत्व येते.
अपघात रोखण्याबरोबर बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलीसांनी जिल्हयात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. वाहन वेगाने चालविणे, वाहन चालविण्याचा परवाना नसणे, टीबल शीट असणे, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी अथवा मालाची वाहतूक करणे अशा अनेक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 330 वाहन चालकांविरोधात वाहतूक पोलीसांनी मंगळवारी (दि.4) कारवाई केली. या कारवाईचा बेशिस्त वाहन चालकांना दणका देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.