जिल्ह्या परिषदेचा स्तुत्य उपक्रम, मातीची धुप थांबविण्यासाठी होणारी मदत
। अलिबाग । प्रतिनिधी ।
महाड येथील दरड दुर्घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने बोध घेत दरड रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मातीची होणारी धुप थांबविण्यासाठी बांबूच्या झाडाचा फायदा मोठ्या प्रमाणात होतो. जिल्ह्यातील दरडग्रस्त भागात बांबूची लागवड करण्यावर जिल्हा परिषदेने भर दिला आहे. बांबूपासून रोजगार निर्मितीला चालना मिळण्याबरोबरच भुस्खलन रोखण्यासाठी बांबूचा फायदा होणार आहे, त्यामुळे बांबू लागवड दरडमुक्तीसाठी एक वरदान ठरणार असल्याचे चित्र समोर येत आहे. मागच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमध्ये जिल्ह्यातील अनेक भागात पुरपरिस्थिती निर्माण झाली होती. पोलादपूर, कर्जत तालुक्यासह महाडमध्ये दरड कोसळली होती. डोंगरभागातील अनेक झाडे, दगड, मातीने गावेच्या गावे उध्वस्त केली. महाड येथील दुर्घटनेनंतर जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत दरड रोखण्यासाठी बांबू लागवड केली. येथील डोंगरभागात सुमारे दोन लाख बांबूच्या रोपांची लागवड केली. बांबूचे मुळ माती धरून ठेवतात. मातीची होणारी धुप थांबविण्यास बांबूची मोठ्या प्रमाणात मदत होते. हे लक्षात आल्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी पुढाकार घेत जिल्ह्यातील गावे, वाड्यांच्या भागात बांबुची लागवड करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. बांबू लागवडीसाठी तालुका, ग्रामपंचायत स्तरावर स्वयंसेवी संस्था, स्वदेश फाऊंडेशन, रोटरी क्लब, लायन्स क्लब, स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्वयंसेवक, स्वयंसहाय्यता बचत गटातील महिला, गावातील महिला मंडळे, भजनी मंडळे व युवक यांचा लोकसहभाग घेतला जाणार आहे. जिल्ह्यात सुमारे सात लाखापेक्षा अधिक बांबूची बेटे तयार केली जाणार आहेत.
व्यवसाय वृध्दीला मिळणार चालना
रायगड ग्रामीण जिल्हा असल्याने जिल्ह्यात आजही बांबूपासून तयार होणार्या उपकरणांना पसंती दर्शविली जाते. टोपली, सुप, झोपाळा, बांधकाम व्यवसाय, खुर्ची, आराम खुर्ची, डायनिंग सेट, सोपा सेट, टी पॉय, शो पीस, वॉटर फॉल, विद्यूत दिवे, बेड, ट्रॉली, परडी अशा अनेक प्रकारचे फर्निचर बनविण्याचे काम बांबूपासून केले जाते. वेगवेगळ्या ठिकाणी बांबूच्या गॅलरी उभ्या होऊ लागल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात बांबुला महत्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्यामध्ये बांबू लागवडीमुळे व्यवसाय वृध्दीला चालना मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरड रोखण्यासाठी बांबूची लागवड महत्वाची आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर बांबूची लागवड करण्यासाठी वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाकडून मागणी करण्याची सुचना केली आहे. त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. बांबू लागवडीतून रोजगाराचे साधनही खुले होणार आहे.
डॉ. किरण पाटील
मुख्य कार्यकारी अधिकारी
रायगड जिल्हा परिषद
बांबू साधारणतः 35 ते 40 वर्षाचे आहेत. बांबूची लागवड केल्यावर तीन ते चार वर्षात उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. हे उत्पादन सुमारे 35 वर्षे मिळते. जिल्ह्यात पाऊस भरपूर पडतो. दरड कोसळण्याची अधिक भीती आहे. त्यामुळे दरड रोखण्यासाठी बांबू वितरण करण्याचे काम केले जात आहे.
नरेंद्र पाटील,
वनपरिक्षेत्र अधिकारी,
अलिबाग