| रायगड | खास प्रतिनिधी |
जिल्हा परिषदेकडे सध्या कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असल्याने त्याचा थेट विपरीत परिणाम दैनंदीन कामकाजावर होत आहे. रायगड जिल्हा परिषदेमधील एकूण 11 विभागामध्ये 2 हजार 901 पदे रिक्त आहेत. काहीच दिवसांपूर्वी शिक्षण विभागातील पदे भरण्यात येणार असल्याने जिल्हा परिषदेमधील पदे लवकर भरण्यासाठी प्रशासकीय स्तरावर हालचाल वाढली आहे. लवकरच भरती प्रक्रीये संदर्भातील जाहिरात प्रसिध्द होणार आहे. त्यामुळे नजिकच्या कालावधीत जिल्हा परिषदेमध्ये मेगा भरती होणार असल्याचे दिसून येते.
आजही मोठ्या संख्येने नागरीक हे ग्रामीण भागांमध्ये राहतात. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी जिल्हा परिषदेची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचा कारभार सुरळीत सुरु राहावा यासाठी त्यांना पुरेसे मनुष्यबळ दिले जाते. रायगड जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय देखील संबोधले जाते. या मिनी मंत्रालयाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना विविध सेवा-सुविधा दिल्या जातात. यासाठी जिल्हा परिषदेचा कारभार हाकण्यासाठी सरकारने मनुष्यबळ नेमुन दिलेले आहे. मात्र काही कारणांनी तब्बल दोन हजार 901 पदे रिक्त आहेत. सरकारकडे सातत्याने नव्याने पदे भरली जावीत यासाठी पाठपुरावा करण्यासाठी दर तीन महिन्यांना रिक्त पदांचा अहवाल पाठवला जातो. मात्र सरकारने अद्याप आपले कान हलवलेले नाहीत. रिक्त पदांमुळे अन्य कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण वाढला आहे. काही कर्मचाऱ्यांना रिक्त पदाचा पदभार स्विकारावा लागत आहे. त्यामुळे कामांचा निपटारा वेगाने होण्यास अडथळा निर्माण होत आहे.
अशी होणार भरती
रायगड जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागात क आणि ड वर्गातील तब्बल 267 पदे रिक्त आहेत. त्याचप्रमाणे वित्त व अर्थ-30, बांधकाम-162, ग्रामीण पाणी पुरवठा-74, आरोग्य-616, शिक्षण-1537, कृषी-16, पशुसंवर्धन विभाग-48, ग्रामपंचायत-111, महिला व बाल कल्याण-0 आणि समाज कल्याण विभागामध्ये 40 पद रिक्त आहेत. प्रशासकीय पातळीवर सातत्याने पदे भरण्यात यावी याबाबत सरकारला रिक्त पदे किती आहेत हे अवगत करुन दिले जाते. मात्र सरकारकडून काहीच सकारात्मक होत नसल्याने कर्मचारी मेराकुटीला आले आहेत, तर सुशिक्षीत बेरोजगार हे जिल्हा परिषदेमध्ये कधी पद भरती होणार याकडे डोळे लावून बसले आहेत.
दर तीन महिन्यांनी रिक्त पदांचा अहवाल सरकारला कळवण्यात येतो. प्रशासनात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे मात्र लवकरच भरती प्रक्रीयेबाबतची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे.
निलेश घुले, उप मुख्यकार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन)