| सोगांव | वार्ताहर |
कनकेश्वर फाटा ते कार्लेखिंड मार्गावर परहूरपाडा येथे अमोनिया वाहतूक करणारा टँकरचा मंगळवारी सकाळी अपघात होऊन सदर टँकर रस्त्याच्या कडेला पलटी झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अपघातानंतर सुरक्षेच्या कारणास्तव आर.सी.एफ. थळ कारखान्याचे अधिकारी व अग्निशमन बंबसहित कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल होत संध्याकाळी सदर अपघातग्रस्त टँकर क्रेनच्या साहाय्याने सुरक्षित काढण्यात आला.
टँकर आर.सी.एफ. थळ येथील कारखान्यातून निघून खोपोलीकडे निघाला होता. अज्ञात वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात रस्त्याच्या कडेला पलटी झाला. अपघातामध्ये वाहन चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. अपघाताची खबर अलिबाग पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव घटनास्थळी आर.सी.एफ. थळ कारखान्याचे अधिकारी व अग्निशमन बंबासहित कर्मचारी यांना पाचारण करण्यात आले होते. टँकर क्रेनच्या साहाय्याने काढतांना वाहतूक पोलिसांनी दोन्ही बाजूंनी वाहतूक बंद केली होती. तसेच, सुरक्षेच्या दृष्टीने या भागातील विद्युत पुरवठा देखील खंडित करण्यात आला होता. या अपघाताची नोंद अलिबाग पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.