काश्मीर, पंजाब या पश्चिम सीमेवरील राज्यांमध्ये अनेक वर्षे हिंसाचार होत असे. सध्या तेथे शांतता आहे. खूप मोठे काही झाल्याशिवाय त्याच्या बातम्या येत नाहीत. ईशान्येकडे आसाम व इतर राज्यांमध्येही हीच स्थिती होती. त्रिपुरा, नागालँड, मिझोरम, मणिपूर या सर्वच राज्यांमध्ये वांशिक दंगली किंवा सरकारच्या विरोधातील आंदोलने सतत चालू असत. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर ईशान्येतील बंडखोरांशी चर्चा सुरू झाली. त्यातून हळूहळू तेथे शांतता प्रस्थापित झाली. या पार्श्वभूमीवर, मणिपूरमध्ये पुन्हा नव्याने भडकलेला हिंसाचार चिंताजनक आहे. त्या राज्यात मैतेई हिंदू बहुसंख्येने आहेत. पूर्वी मणिपूरचे संस्थानच मैतेई राजांचे होते. कुकी हे आदिवसी ख्रिश्चन आहेत. ते अल्पसंख्य आहेत व जंगलांमध्ये राहतात. गेल्या काही वर्षांपासून मैतेईंना निर्विवाद सत्ता हवी आहे. कुकींना बेदखल करण्याचे प्रयत्न चालू आहेत. पण कुकी हे काही संपूर्ण मागास नाहीत. त्यांच्यातील तरुण पिढीदेखील शिकण्यासाठी व नोकर्यांसाठी बाहेर पडली आहे. त्यामुळे त्यांना हुसकावून लावणे हे सोपे नाही. यामुळेच सध्याची यादवी उफाळली आहे. भाजप मैतेईंची बाजू घेत आहे हे खरेच आहे. पण अनेक कुकी समाजाचे कार्यकर्ते व आमदारही त्या पक्षात आहेत. आता त्यांना फसवल्यासारखे वाटत आहे. मोदी अमेरिकेत आणि फ्रान्सला जातात, पण मणिपूरला येऊ शकत नाही असे म्हणून भाजपच्या कुकी आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. कुकी समाजाच्या महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर अत्याचार केले गेल्याच्या घटनेच्या व्हिडिओने देश-परदेशात खळबळ उडाली. अशा हजारो तक्रारी पोलिसांकडे गेल्या दोन महिन्यांपासून आल्या आहेत असे भाजपचे मुख्यमंत्री बिरेनसिंग यांनी सांगितले. या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न होत असल्याचे दिसत नाही. राज्य सरकारने दोषींविरुध्द कारवाई करावी असे सांगून पंतप्रधानांनी उपरणे झटकले. नुकतीच मणिपूरमध्ये एका स्वातंत्र्यसैनिकाच्या ऐशी वर्षाच्या पत्नीची जाळून हत्या केल्याचे उघड झाले. अनेक महिलांवर बलात्काराच्या घटना झाल्याची प्रकरणे बाहेर येत आहेत. हे प्रकार ममता बॅनर्जी किंवा केजरीवालांच्या राज्यात झाला असता तर एव्हाना तेथे राष्ट्रपती राजवट लागू झाली असती. भाजपने देशभर आंदोलनांचा बार उडवून दिला असता. दुर्दैवाने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये किमान माणुसकी आणि संवेदनशीलता देखील उरलेली नाही. त्यामुळे झालेल्या घटनांवर ते पांघरूण टाकत आहेत. देशातील राजकारण इतक्या खालच्या पातळीला कधीही गेलेले नव्हते. आता हे लोण मिझोरममध्ये पसरले आहे. तेथील मैतेई लोकांनी राज्य सोडून जावे असा इशारा बाकीच्या जमातींनी दिला आहे. ही सर्व चीनच्या सीमेजवळची राज्ये आहेत. तेथील समाजांमध्ये अशी दुही निर्माण होणे हे अत्यंत घातक आहे. राष्ट्र प्रथम म्हणणार्या पक्षाला हे कळत नाही असे नव्हे. पण आपण सर्व काही मॅनेज करू आणि त्यातून राजकीय फायदा उठवू असा फाजील आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला आहे. यावर आता जनतेनेच इलाज करण्याची गरज आहे.